Pudhari
मुंबई

Navi Mumbai Education Board: नवी मुंबई पालिकेच्या शिक्षण मंडळाकडून शिक्षकांचा अपमान

शिक्षकदिनी आगरी-कोळी भवनात फरशीवर बसून केले शिक्षकांनी जेवण

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र पाटील

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने 11 सप्टेंबर रोजी नेरुळ येथील आगरी कोळी भवनात शिक्षकदिन साजरा केला. यावेळी शिक्षकांना बसायला खुर्च्याही नव्हत्या. शिक्षकांना चक्क फरशीवर बसून जेवण करावे लागले. बालवाडी शिक्षकांना तर आगरी कोळी भवनातून बाहेर जाण्याचे फर्मान सोडण्यात आले होते. त्यामुळे या अवमानजनक प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आता शिक्षकांकडून केली जात आहे. (Latest Mumbai News)

आगरी कोळी समाज भवनमधे कार्यक्रम घेतला गेला. ठोक मानधन, घड्याळी तासिका बालवाडी मदतनीस, कायम शिक्षक असे एकूण 1200 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार होते. असे असताना जेमतेम 600 खुर्च्या उपलब्ध होत्या. शिवाय ऐनवेळी कार्यक्रमस्थळी आलेल्या बालवाडी शिक्षकांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले.

यापेक्षाही कहर म्हणजे उपस्थित असलेले शिक्षक आगरी कोळी भवनात फरशीवर बसून जेवत असल्याचे विदारक चित्र यावेळी पहायला मिळाले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे त्या दिवशी हरकतींची सुनावणी असल्याने उपस्थित राहू शकत नव्हते. त्यामुळे एक दिवसानंतर वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहातही हा कार्यक्रम आयोजित करता येऊ शकला असता. असे असताना 11 सप्टेंबरला आगरी कोळी भजनाचा हट्ट काही अधिकार्‍यांनी का धरला, असा प्रश्न आता शिक्षकांकडून विचारला जात आहे.

शिक्षकदिनी अशा पध्दतीने शिक्षकांच्या केलेल्या अवमानाचा निषेध होत असून या प्रकाराला जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांची हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे.

या कार्यक्रमास प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षिका, बालवाडी शिक्षिका, मदतनीस बहुसंख्येने उपस्थित होते. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते शिक्षक व विद्यार्थ्यांचा अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी शिक्षकांनी मांडलेल्या शैक्षणिक साहित्याच्या प्रदर्शनाचे अवलोकन करून कौतुक केले. तर 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशीप परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना गौरविले गेले तसेच गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना अध्यापन केलेल्या शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये प्रथम 3 क्रमांकांचे विद्यार्थी तसेच प्रत्येक विषयात प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक व शाळा यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये शुभम कनोजिया, नमुंमपा शाळा क्रमांक 18, सानपाडा या विद्यार्थ्याला तामिळनाडू येथील शिक्षण मंत्र्यांकडून विशेष पुरस्कार मिळाला होता, त्यालाही सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये शाळा क्रमांक 42, घणसोली यांचे घनसोली पॅटर्न स्कॉलरशीप याबाबत सादरीकरण झाले. शाळा क्रमांक 55, कातकरी पाडा यांचेमार्फत मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा व विविध उपक्रम याबाबत सादरीकरण करण्यात आले.

सिंगापूर येथील शिक्षण पद्धतीबाबत शाळा क्रमांक 36 चे शिक्षक प्रशांत गाडेकर यांनी माहिती दिली. शाळा क्रमांक 31, कोपरखैरणे येथील परसबागेबद्दल सविस्तर सादरीकरण झाले. शिक्षकांचे सांस्कृतिक कार्यक्रमही मोठ्या उत्साहामध्ये पार पडले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये चार शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला.

शिक्षकांचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलबित आहेत. वरिष्ठ श्रेणी अजून वेतनात दिली नाही. निवड श्रेणी नाही. केंद्रप्रमुख विस्तारअधिकारीपदे भरली नाहीत. भविष्य निर्वाह निधी पावत्या चार वर्षांपासून दिल्या नाही. पदवीधर वेतनश्रेणी बाकी आहे. त्यामुळे शिक्षण मंडळ प्रशासन नेमके करते काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे एक विशिष्ट संघटनेचे काही मंडळी कार्यालयात ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे कुठलेही काम अर्थकारणाशिवाय काम होत नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT