saurabh rao Pudhari
मुंबई

Turbhe Hospital Doctor Suspension: विनयभंग करणारा नवी मुंबई महापालिकेचा डॉक्टर निलंबित; आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

आठवडा उलटूनही झाली नव्हती कारवाई

पुढारी वृत्तसेवा

वाशी: तुर्भे येथील श्रीरामतनु माता-बाल रुग्णालयातील डॉ. सौरभ बोरसे याने एका महिला रुग्णाचा विनयभंग केल्या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी बोरसे यांना काल संध्याकाळी उशिरा निलंबित करण्याचे आदेश दिले.

डॉ. सौरभ बोरसे याने एका महिला रुग्णाचा विनयभंग करून आठवडा होऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे जनतेत संतापाचे वातावरण होते.

या घटने नंतर रुग्णालयात उपचारासाठी जाण्यास महिला वर्गात भीती आणि असुरक्षितता निर्माण झाली होती. या रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास सदर डॉक्टर तपासणी करण्यास असेल,तर आपल्या बाबतीतही अशी घटना घडली, तर काय, असा प्रश्न महिला रुग्णांना पडला आहे. अनेक महिलांनी ही भीती लोकप्रतिनिधींकडे व्यक्त केली आहे.

याचीच नोंद घेत या डॉक्टरवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका कविता पाटील यांनी महापालिका आयुक्तांना केली होती.

इतकी गंभीर घटना घडूनही आरोग्य विभागाकडून तात्काळ यासंबंधीची माहिती प्रशासन विभागाला देणे अपेक्षित होते; मात्र आरोग्य विभागाच्या गहाळपणामुळे याविषयी कार्यवाहीचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यास आठवडा लागला होता. या घटनेमुळे महापालिकेच्या आरोग्य सेवेची प्रतिमा मलीन झाली आहे.

दरम्यान डॉ. बोरसे याला निलंबित करण्याच्या आदेशात म्हटले आहे की, डॉ. बोरसे हे सार्वजनिक रुग्णालय नेरुळ येथे कार्यरत असताना याच्याविरुध्द नवी मुंबई महानगरपालिका पदव्युत्तर पदवी विज्ञान शिक्षण संस्था विशाखा समितीकडे महिलांच्या लैंगिक छळाची तक्रार प्राप्त झाली होती. यामध्ये तो दोषी असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

डॉ. बोरसेच्या अशा कृत्यामुळे पालिकेची प्रतिमा मलिन झाली असून जनमानसात पालिकेच्या कर्मचाऱ्यांवरील विश्वसाहर्ता सुध्दा अल्प झाल्याचे दिसून येत आहे. तसेच अशा घटनेमुळे पालिकेतील कर्मचाऱ्यांविरूध्द जनप्रक्षोभ वाढीस लागला आहे.

डॉ. बोरसेकडून विनयभंग करण्याच्या घटना वारंवार घडत असून त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बोरसे याला तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी आदेशात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT