Cybercrime In Mumbai
कोपरखैरणे : नवी मुंबईतील दोन जणांना सायबर ठगांनी सुमारे दोन कोटी 30 लाखांना गंडवल्याची घटना घडली आहे. एका अभियंत्याची शेअर मार्केटमध्ये चौपट परताव्याचे अमिष दाखवत 2 कोटी 20 लाख 70 हजारांची तर एका ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत 8 लाखांची फसवणूक केली आहे.
नेरुळ येथे राहणारे अभियंता यांना 16 एप्रिल रोजी व्हाट्सअॅप कॉल आला. बजाज फायनान्शियल सिक्युरिटी आणि अपस्टोक्स या कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. आमच्या कंपनीद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पवधीत भरघोस परतावा मिळेल असे आश्वासन दिले. याला भुलून फिर्यादीने विविध बँक खात्यात तब्बल 2 कोटी 20 लाख 70 हजार वळते केले. आरोपींनी दिलेल्या अॅपमध्ये मोठा परतावा दिसत होता. मात्र तो खात्यात वर्ग केला जात नव्हता. अनेकदा सांगूनही परतावा मिळाला नाही म्हणून मुद्दल मागितली. मात्र तीही मिळाली नाही. हा सर्व प्रकार 16 एप्रिल ते 3 जून दरम्यान घडला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी संबंधित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
दुसर्या घटनेत सीवुड्स येथील एका 81 वर्षीय वृद्धाला डिजिटल अटकची भीती दाखवून 8 लाखांची फसवणूक केली आहे. राहुल शर्मा, अशोक राऊत, संजय पिसे आणि प्रदीप जैस्वाल अशी यातील आरोपींची नावे आहेत. फिर्यादीला 29 मे रोजी डेल्टा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ मुंबई येथून राहुल शर्मा बोलत असल्याचे सांगून तुमचे नावे पैशांची अफरातफर झाली आहे.
त्यामुळे तुम्हाला डिजिटल अटक केली आहे, अशी धमकी देण्यात आली. पैसे आरबीआयच्या खात्यात वर्ग करून घेतले. हा सर्व प्रकार 29 मे ते 1 जून दरम्यान घडला. मात्र अनेक दिवस उलटूनही पैसे परत मिळाले नाही आणि संपर्क बंद झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.