Navi Mumbai Air Pollution Pudhari
मुंबई

Navi Mumbai Air Pollution: अव्हेन्यू सुपरमार्टची बांधकाम साईट सील; वायू प्रदूषण केल्याप्रकरणी नवी मुंबई महापालिकेची आक्रमक कारवाई

परंतु, याबाबत योग्य उपाययोजना केली नसल्याचे महापालिका आयुक्तांच्या पाहणीत निदर्शनास आले.

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: हवा प्रदूषणात होणा-या वाढीसंदर्भात उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेली जनहितार्थ याचिकेवरील आदेशान्वये धूळ व प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक होते.

परंतु, याबाबत योग्य उपाययोजना केली नसल्याचे महापालिका आयुक्तांच्या पाहणीत निदर्शनास आले. त्यामुळे शनिवारी मे. अव्हेन्यू सुपरमार्ट लि., भुखंड क्र. 3-1ए, सेक्टर 18, तुर्भे येथील बांधकाम आणि विकासकामाची साईट सीलबंद करण्यात आली.

ही मोहीम आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या आदेशान्वये, अति. आयुक्त डॉ. राहुल गेठे व उपायुक्त (अतिक्रमण) संजय शिंदे, यांच्या निर्देशानुसार तुर्भे सहाय्यक आयुक्त, कनिष्ठ अभियंता व इतर अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीत केली आहे.

या मोहिमेसाठी अतिक्रमण निर्मूलन पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार आणि अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षक तैनात ठेवले होते. यापुढील काळातही अशा प्रकारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी सर्वच विभागांमध्ये कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या तुर्भे विभागांतर्गत उच्च न्यायालयाने सुमोटो जनहित याचिकेवरील २४ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर तात्काळ व प्रभावी उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिलेल आहेत.

त्या अनुषंगाने महापालिका कार्यक्षेत्रात बांधकामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे होणा-या ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व ब्लास्टींगकरिता अवलंबवायची ‘मानक कार्यप्रणाली’ व बांधकाम प्रकल्पांच्या साईटवर होणा-या वायू व ध्वनी प्रदूषण दंडात्मक कारवाईबाबतची नियमावली अन्वये दंडात्मक शुल्क भरणा करणेबाबत संबंधित विकासकास, बांधकामधारकांना सांगण्यात आले होते.

ध्वनी, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्याबाबत खातरजमा करूनच काम करण्यात यावे. बांधकामस्थळाच्या सभोवतालच्या ५०० मीटरपर्यंतच्या परिसरात व रस्त्यावर धूळ प्रदूषण होऊ नये याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी अन्यथा सुरू असलेले बांधकाम त्वरीत बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशा आशयाची नोटीस संबंधित विकासकास व बांधकामधारकास बजावण्यात आलेल्या आहेत.

तथापि, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी पाहणी केली असता त्रूटी आढळून आलेल्या होत्या. त्यात बांधकाम सुरू असलेल्या इमारतींना सर्व बाजूंनी हिरव्या कापडाच्या ओल्या ज्युट शीटच्या ताडपत्रीने बंद केलेले आढळून आले नाही. बांधकामाच्या ठिकाणी साहित्य लोडींग व अनलोडींग करताना वॉटर फोगिंग केले जात नाही. बांधकाम मजुरांनी मास्क, गॉगल्स, ॲप्रॉन इ. परिधान केलेले आढळले नाही.

बांधकाम स्थळाच्या सभोवतालच्या ५०० मीटरपर्यंतच्या परिसरात व रस्त्यावर धूळ प्रदूषण होऊ नये यासाठी पाणी फवारणी यंत्र कार्यान्वित असल्याचे आढळले नाही. बांधकाम साहित्याची वाहतूक करताना हिरव्या कपड्याने झाकलेले आढळले नाही. पाहणी दरम्यान साईटवर कोणीही व्यवस्थापक उपस्थित नसल्याचे आढळून आले. रस्ता, पदपथावर माती व धूळ असल्याचे आढळून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT