Mumbai Police Wanted Accused: फरार आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांचे ‘ऑपरेशन जुन्या फायली’

मोबाईल लोकेशन, खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांची धडक मोहीम; जानेवारी-ऑगस्टदरम्यान ३८० फरार आरोपींना गजाआड करण्यात यश
Mumbai Police Wanted Accused
Mumbai Police Wanted AccusedPudhari
Published on
Updated on

मुंबई: गुन्हा करून वर्षानुवर्षे पोलिसांच्या नजरेतून पसार झालेल्या आरोपींच्या जुन्या फाईली आता पुन्हा उघडल्या जात आहेत. मोबाईल लोकेशन, तांत्रिक तपास, खबऱ्यांचे जाळे आणि जुन्या नोंदींच्या आधारे मुंबई पोलिसांनी फरार आरोपींचा शोधमोहीम तीव्र केली आहे.

जानेवारी ते ऑगस्टदरम्यान उपलब्ध नोंदी आणि प्रसिद्ध झालेल्या कारवायांच्या आधारे सुमारे ३८० फरार आणि वाँटेड आरोपी पोलिसांनी गजाआड केले आहेत. यामध्ये २० वर्षांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपींचाही समावेश आहे.

जुन्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे यापुढे सुरू राहणार आहे. अनेक आरोपी बनावट ओळख वापरून महाराष्ट्राबाहेर राहत होते, तर मोहिमेत विविध पोलिस ठाण्यांमध्ये समन्वय, क्राइम-मॅपिंग आणि संशयित नेटवर्कची तपासणी करण्यात आली. अशा मोहिमा प्रलंबित जुन्या प्रकरणांचा बॅकलॉग कमी करण्यासाठी वेळोवेळी राबवल्या जात आहेत, असे पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Mumbai Police Wanted Accused
CMRF Maharashtra: रुग्णांच्या नातेवाईकांच्या व्यवस्थेसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार; सीएमआरएफच्या वेबसाईटवर सर्व तपशील उपलब्ध

२८ वर्षांनी संपला शोध

जोगेश्वरी पोलिसांनी १९९८च्या गुन्ह्यातील आरोपीला २८ वर्षांनी अटक केली. घरफोडी, चोरी आणि मालमत्तेचे नुकसान केल्याच्या प्रकरणात तो फरार होता. तांत्रिक तपासातून त्याचा ठावठिकाणा डोंबिवलीत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले.

४५ वर्षांपासून फरार आरोपी गजाआड

मुंबई पोलिसांच्या या मोहिमेची व्याप्ती किती मोठी आहे, हे ४५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीच्या अटकेवरून स्पष्ट होते. ट्रॉम्बे पोलिसांनी १९८१मध्ये दाखल झालेल्या हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपीला तब्बल ४५ वर्षांनी अटक केली. अनेक वर्षे उलटूनही पोलिसांनी जुन्या प्रकरणातील नोंदी आणि उपलब्ध माहितीच्या आधारे त्याचा शोध सुरू ठेवला होता.

दरोडा प्रकरणातील आरोपी २६ वर्षांनी सापडला

खार पोलिसांनी २०००मधील दरोडा प्रकरणातील २६ वर्षांपासून फरार आरोपीला नवी मुंबईतील नेरूळमधून अटक केली. जुन्या प्रकरणातील आरोपीच्या हालचालींची माहिती गोळा करून पोलिसांनी त्याचा माग काढला.

पीटा प्रकरणातील आरोपी २२ वर्षांनी जेरबंद

पीटा कायद्यांतर्गत दाखल प्रकरणातील २२ वर्षांपासून फरार आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली. आरोपीने ठिकाणे बदलून पोलिसांना चकवा दिला होता. तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले.

Mumbai Police Wanted Accused
Polytechnic Admission: राज्यातील २.३५ लाख विद्यार्थी कौशल्य, तंत्रशिक्षणाच्या वाटेवर

फरार राहणे आता सोपे नाही

मोबाईल लोकेशन, डिजिटल व्यवहार, तांत्रिक विश्लेषण, सरकारी नोंदी आणि खबऱ्यांचे जाळे यामुळे आरोपींना वर्षानुवर्षे ओळख लपवून राहणे कठीण झाले आहे. गुन्हा कितीही जुना असला तरी त्याची फाईल बंद होत नाही. जुन्या फाईली उघडून आरोपींचा माग काढण्याच्या मुंबई पोलिसांच्या मोहिमेमुळे अनेक वर्षांपासून तपासाच्या कक्षेबाहेर असलेले आरोपी पुन्हा कायद्याच्या कचाट्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news