मुंबई

नवी मुंबई : वंडर्स पार्क अपघाताची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश

मोहन कारंडे

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : नवी मुंबईचे आकर्षण केंद्र असलेल्या वंडर्स पार्कमध्ये घडलेल्या अपघाताची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

वंडर्स पार्कच्या नूतनीकरणानंतर 1 जून पासून वंडर्स पार्क नागरिकांसाठी खुले केले आहे.‌ सध्या शालेय सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे. या ठिकाणी नव्याने बसविण्यात आलेल्या 7 राईड्सचा आनंद नागरिकांकडून घेतला जात असताना काल शनिवारी 3 जून रोजी, रात्री 8.30 च्या सुमारास त्यामधील स्काय स्विंगर या पाळणा स्वरूपातील राइडवर अपघात घडला व 6 व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नार्वेकर यांनी दिले.

वंडर्स पार्क येथील सातही राईड्स 1 जून रोजी सुरू झाल्यापासून व्यवस्थित सुरू होत्या. वंडर्स पार्कचे परिचलन करणाऱ्या मे.अश्विनी कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रा या‌ंच्यामार्फत सर्व राईड्सवर स्वतंत्र ऑपरेटरची व्यवस्था करण्यात आली असून टेक्निशियन मार्फत नियमीत तपासणीही करण्यात येत होती. शनिवारी 3 जून रोजी टेक्निशियन मार्फत स्काय स्विंगर या राईडची तांत्रिक तपासणी सुरू असताना हा अपघात घडला. ही अत्यंत गंभीर बाब असून याची तत्परतेने सखोल चौकशी करावी व कारणे तपासून संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. वंडर्स पार्क पावसाळा कालावधीसाठी अंदाजे १५ जूनपासून बंद राहणार आहे. पण मुलांच्या सुट्टीचा कालावधी लक्षात घेता नागरिकांच्या मागणीनुसार वंडर्स पार्क नागरिकांसाठी खुले राहणार आहे.  त्यामधील केवळ स्काय स्विंगर ही राइड या कालावधीत बंद असणार आहे. वंडर्स पार्क मधील नागरिकांच्या सुरक्षतेबाबत अधिक दक्ष राहण्याचे काटेकोर निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिलेले आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT