Navi Mumbai Coastal Road Pudhari
मुंबई

Navi Mumbai Coastal Road: सिडको उभारणार खारघर कोस्टल रोड; प्रवासाचा वेळ 45 मिनिटांवरून थेट 10 मिनिटांवर

भविष्यात नवी मुंबई विमानतळापर्यंत हाय-स्पीड कनेकटीव्हीटी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

कळंबोली: नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास सोपा आणि वाहतूककोंडीमुक्त करण्यासाठी शहरात दोन कोस्टल रोड उभारले जाणार आहेत. यापैकी एक म्हणजे खारघर सागरी किनारा मार्ग किंवा कोस्टल रोड. सिडकोच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 45 मिनिटांवरून थेट 10 मिनिटांवर येणार आहे. तसेच, भविष्यात नवी मुंबई विमानतळापर्यंत हाय-स्पीड कनेकटीव्हीटी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

खारघरच्या सेक्टर 16मधील जलमार्गापासून हा कोस्टल रोड सुरू होणार आहे. पनवेल खाडीवरून खारघर स्थानकाजवळील पे हाऊसिंग स्कीमच्या बाजूने सीबीडी बेलापूरमधील सेक्टर 15पर्यंत हा मार्ग जातो. त्यापुढे डीपीएस नेरुळ परिसरात संपतो. कोस्टल रोडमुळे खारफुटी आणि खाडीवर कमीत-कमी परिणाम होण्यासाठी या मार्गाचा काही भाग जमिनीच्या दिशेने वळवण्यात आला आहे.

असा आहे मार्ग

खारघर कोस्टल रोडमुळे मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाच्या मार्गांना नवी मुंबई शहर आणि विमानतळाशी जोडणी मिळणार आहे. शीव पनवेल मार्गावर कोस्टल रोड गृहनिर्माण प्रकल्प आणि कॉर्पोरेट पार्कला ही जोडणार आहे. तसेच, खारघरमध्ये नवीन बनत असलेल्या आंतरराष्ट्रीय कोर्पेरेट पार्कशीही थेट जोडणी मिळणार आहे.

नेरूळजवळ या मार्गाला पाम बीच रोडशीही थेट जोडणी मिळणार आहे. खारघर कोस्टल रोडमुळे खारघर, सीबीडी बेलापूर आणि नेरुळदरम्यान प्रवासाचा वेळही कमी होणार आहे. सिडकोकडून या प्रकल्पाचं काम सुरू असून 2028पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हा मार्ग सहा पदरी असून भविष्यात कोस्टल रोडला अटल सेतूशी जोडण्याचीही शक्यता आहे.

1000 कोटींहून अधिक खर्च

खारघर कोस्टल रोडसाठी तब्बल 1020.70 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग 9.678 किमी लांब असून पनवेलच्या खाडीवरून खारघर, सीबीडी बेलापूर आणि नेरूळपर्यंत जोडणार आहे. या मार्गाचं बांधकाम सध्या दोन टप्प्यात सुरू आहे. पहिल्या टप्प्यात खारघर ते सीबीडी बेलापूर मार्ग तयार करण्यात येणार असून पुढील टप्प्यात सीबीडी बेलापूर ते नेरूळ जेट्टीपर्यंत रस्ता बांधण्यात येईल. दरम्यान, विमानतळासह हा मार्ग शीव-पनवेल महामार्गाशीही जोडला गेला असेल. त्यामुळे मुंबईतील पूर्व उपनगरं थेट विमानतळापर्यंत जोडली जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT