कोपरखैरणे : नवी मुंबई महापालिकेवर भाजपने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी दिसून आली. विजयाच्या कैफात जल्लोष करीत नेरुळमधील शिवसेना उमेदवाराच्या कार्यालयात घुसून मोडतोड केली. यात एकजण जखमी झाला आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्यातील राजकीय आरोपांमुळे वातावरण तंग होते. मात्र विजयानंतर नाईकांनी निवडणूक संपली, वैरही संपले अशी प्रगल्भ भूमिका मांडली. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांची ही भूमिका चुकीची ठरवली.
शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास प्रभाग 23 च्या शिवसेनाच्या उमेदवार वैशाली माने या त्यांचे वडील विजय माने, चुलत भाऊ जीत माने व कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयात बसले होते. त्यावेळी त्यांच्या कार्यालयासमोर भाजपच्या विजयी उमेदवाराचा जल्लोष सुरू होता. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत माने यांच्या कार्यालयाची शिरून मोडतोड सुरू केली.
माने यांनी त्यांच्या महिला कार्यकर्त्यांना अगोदर या गोंधळातून बाहेर काढले. मात्र यात जीत माने याला बेदम मारहाण झाली असून एका खासगी रुग्णालयात त्याला उपचार्थ दाखल केले आहे, अशी माहिती विजय माने यांनी दिली. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले आहे.