Court File Photo
मुंबई

Belapur Court Incident: जन्मठेप सुनावताच आरोपीची पाचव्या मजल्यावरून उडी; आरोपीचा मृत्यू

नागेश बाबू लाड याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू; न्यायालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: हत्येच्या गंभीर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर काही वेळातच नागेश बाबू लाड (वय ३४) नावाच्या आरोपीने बेलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

नागेश बाबू लाड याच्या विरोधात २०१९ मध्ये नेरूळ पोलीस ठाण्यात हत्या (कलम ३०२) आणि हत्येचा प्रयत्न (कलम ३०७) या गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आल्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत होता. सदर खटल्याची सुनावणी बेलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होती.

सोमवारी अंतिम सुनावणी पार पडली. न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षींची पडताळणी करून नागेश लाड याला दोषी ठरवले आणि आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. शिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेसाठी त्याला बाहेर आणले जात असताना त्याने न्यायालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारली.

नागेश लाड गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. न्यायालयासारख्या संवेदनशील आणि सुरक्षित ठिकाणी कैद्याने पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने न्यायालयीन सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

कैद्याला न्यायालयीन कक्षातून बाहेर आणताना नेमकी कोणती सुरक्षा व्यवस्था होती, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होते का आणि ही घटना कशी घडली, असे प्रश्न पुढे आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT