Ayurvedic Investment Scam  pudhari photo
मुंबई

Ayurvedic Investment Scam : आयुर्वेदिक उत्पादनांच्या बोगस गुंतवणूक योजनेचा पर्दाफाश

‘अर्थवर्धन हेल्थ अँड वेल्थ’च्या सीएमडीसह चौघांना बेड्या; ९ हजार आयडींचे जाळे, २६.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

कोपरखैरणे : आयुर्वेदिक उत्पादनांच्या नावाखाली आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना गुंतवणुकीच्या जाळ्यात ओढणाऱ्या टोळीचा नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. ‘अर्थवर्धन हेल्थ अँड वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या माध्यमातून साखळी पद्धतीने अनियंत्रित ठेव योजना चालविणाऱ्या टोळीच्या सीएमडीसह चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महादेव अच्युतराव काकडे, दीपक फुलाजी शादूल, संतोष नाथा आरवेल आणि ओमप्रकाश जीतलाल गुप्ता रा. वाशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अवघ्या तीन महिन्यांत तब्बल नऊ हजार आयडी तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनेत पाच हजार रुपये भरून सदस्यत्व घेण्याचे आमिष दाखविले जात होते. नवीन सदस्य जोडल्यास प्रत्येक जोडीमागे एक हजार रुपये कमिशन आणि महिन्याला सहा लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते, असे सांगितले जात होते. एवढेच नव्हे, तर कोणताही नवीन सदस्य न जोडता दर आठवड्याला ५०० रुपये भरल्यास १४ महिन्यांत ६० हजार ६०० रुपये नफा मिळेल, असेही सांगून नागरिकांना भुलविले जात होते.

या योजनेतील धक्कादायक बाब म्हणजे, जमा होणाऱ्या रकमेपैकी १० टक्के रक्कम आयुर्वेदिक उत्पादनांवर खर्च केली जात होती. उर्वरित आर्थिक व्यवहारातून नवीन सदस्यांकडून जमा होणाऱ्या पैशांतूनच जुन्या सदस्यांना परतावा दिला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. कोणताही वैध व्यावसायिक आराखडा नसताना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून पैसे गोळा केले जात होते. ऑगस्ट २०२६ मध्ये सुरू झालेल्या या योजनेने अवघ्या तीन महिन्यांत नऊ हजार आयडींचा टप्पा गाठल्याची माहिती आरोपींनी दिली आहे.

गुंतवणूकदारांनो, सावधान!

या योजनेत पैसे गुंतविलेल्या नागरिकांनी आवश्यक पुराव्यांसह नवी मुंबई गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेशी किंवा एपीएमसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. केवळ नवीन सदस्य जोडल्यावर कमाई, काहीही न करता भरघोस परतावा किंवा अल्पावधीत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखविणाऱ्या योजनांपासून नागरिकांनी सावध राहावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

आरोपींच्या दोन कारमधून केला मुद्देमाल जप्त

आरोपींच्या दोन कारमधून ‘अर्थवर्धन’ ब्रँडची सुमारे ५ लाख ३६ हजार रुपयांची आयुर्वेदिक उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. तसेच दोन कारसह एकूण २६ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

डमी ग्राहकाच्या मदतीने पोलिसांचा सापळा

या प्रकाराची गोपनीय माहिती मिळताच आर्थिक गुन्हे शाखेने डमी ग्राहक पाठवून आरोपी दीपक शादूल याच्याशी संपर्क साधला. त्याने संपूर्ण योजनेची माहिती आणि गुंतवणुकीचा प्लॅन समजावून सांगितला. त्यानंतर मुख्य आरोपी महादेव काकडे आणि दीपक शादूल यांनी पाच हजार रुपये ऑनलाइन स्वीकारून आयडी तयार केला. यावेळी संतोष आरवेल आणि ओमप्रकाश गुप्ता हेही नागरिकांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करत असल्याचे निदर्शनास आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT