नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. राज्यपातळीवर वरिष्ठ नेत्यांमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असतानाच, स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये मात्र तीव्र मतभेद समोर आले, त्यामुळे गुरुवारी दोन्ही पक्षांची झालेली संयुक्त बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली.
चर्चेला सुरुवात होताच दोन्ही पक्षांच्या मागण्या खूपच भिन्न असल्याचे स्पष्ट झाले. भाजपच्या वतीने माजी महापौर सागर नाईक यांनी एकूण 111 जागांपैकी 80 जागांची मागणी केली. याशिवाय भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूर मतदारसंघासाठी स्वतंत्रपणे 40 जागांची मागणी करत भाजपचा दावा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाने नवी मुंबईत आपली संघटनात्मक ताकद आणि मागील निवडणुकांतील कामगिरीचा दाखला देत 57 जागांवर दावा सांगितला.
या परस्परविरोधी आकड्यांमुळे बैठक चर्चेऐवजी वादाच्या दिशेने वळली. अखेर दीर्घकाळ चर्चा होऊनही कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने ही बैठक थांबवण्यात आली. त्यामुळे नवी मुंबईतील महायुतीबाबत संभ्रम कायम असून, या निष्फळ बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता पसरली आहे.
नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या शाळेत आयोजित या बैठकीत दोन्ही पक्षांचे प्रमुख स्थानिक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना शिंदे गटाकडून खासदार नरेश म्हस्के, उपनेते विजय नाहटा, ऐरोली मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर सहभागी झाले होते, तर भाजपकडून आमदार मंदा म्हात्रे, जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
गुरुवारी सानपाडा येथील भाजप कार्यकर्त्यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी मोर्चा नेऊन माजी नगरसेवक दशरथ भगत यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शविला. दशरथ भगत यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली.
कार्यकर्त्यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, दशरथ भगत यांना उमेदवारी दिल्यास पक्षाला स्थानिक पातळीवर मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे पक्षाने कार्यकर्त्यांची मते लक्षात घेऊन उमेदवार निवडीचा निर्णय घ्यावा, या घडामोडींची दखल घेत भाजपकडून येत्या शनिवारी पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.