

नवी मुंबई : मुंबईच्या विमान वाहतूक क्षेत्रातील एका सुवर्णकाळाला गुरुवार (दि. 25) पासून सुरुवात झाली. बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले व्यावसायिक विमान झेपावले आणि मुंबईच्या दळणवळण क्षमतेत मोठी भर पडली. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी स्वतः उपस्थित राहून पहिल्या विमानातील प्रवाशांचे स्वागत केले.‘आजचा दिवस मुंबई आणि संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा आहे. नवा भारत काय साध्य करू शकतो, याचे हे विमानतळ प्रतीक आहे. राष्ट्रनिर्मितीच्या या प्रवासात कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचा सहभाग असणे हीच आमची खरी शक्ती आहे,’ असे उद्गार गौतम अदानी यांनी यावेळी काढले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुुरू झाल्याने लंडन, न्यूयॉर्क आणि टोकियो यांसारख्या जागतिक शहरांच्या रांगेत मुंबईचा समावेश झाला आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे सर्वांचा प्रवास सुलभ करण्यासाठी या शहरांमध्ये एकापेक्षा जास्त विमानतळे कार्यरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (सीएसएमआयए) वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने संकल्पित केलेला हा प्रकल्प, अदानी समूहाची गुंतागुंतीच्या, राष्ट्रनिर्मितीच्या पायाभूत सुविधा विक्रमी वेळेत साकार करण्याची क्षमता अधोरेखित करतो. अदानी एअरपोर्टस् होल्डिंग्स लिमिटेडद्वारे विकसित हा प्रकल्प केवळ मुंबई महानगर प्रदेशासाठीच नव्हे, तर देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.
बंगळूरवरून आलेल्या विमानाला ‘वॉटर कॅनन’ सलामी
उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी सकाळी 8.00 वाजता इंडिगोचे (6 ए 460) पहिले व्यावसायिक विमान बंगळूरवरून नवी मुंबईत दाखल झाले. यावेळी विमानाचे स्वागत पारंपरिक ‘वॉटर कॅनन’ सलामी देऊन करण्यात आले. पहिल्या दिवशी नऊ देशांतर्गत शहरांसाठी 48 उड्डाणांचे यशस्वी संचलन झाले, ज्यातून सुमारे 4,000 प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे, पहाटे 5 ते 7 या वेळेत प्रवाशांचा सर्वाधिक ओघ पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) येणारा ताण कमी करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित केलेला हा प्रकल्प पूर्णत्वाला गेला असून, तो अदानी समूहाची गुंतागुंतीच्या, राष्ट्रउभारणीसाठी महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विक्रमी वेळेत साकार करण्याची अदानी उद्योगसमूहाची क्षमता अधोरेखित करतो.
गौतम अदानींकडून प्रवाशांचे स्वागत
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी स्वतः उपस्थित राहून पहिल्या विमानातील प्रवाशांचे स्वागत केले. सकाळी 08.00 वाजता बंगळूर येथून आलेले इंडिगोचे 6 ए460 हे नवी मुंबई विमानतळावर उतरणारे पहिले विमान ठरले. यावेळी विमानतळ कर्मचारी आणि प्रथमच विमानप्रवास करणार्या प्रवाशांशी संवाद साधला. या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे परमवीर चक्र विजेते कॅप्टन बना सिंग आणि सुभेदार मेजर संजय कुमार. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत झाले. यावेळी भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव, मिताली राज, फुटबॉलपटू सुनील छेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विराज घेलानी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्रीयन संस्कृतीचा थाट
विमानतळाच्या आवारात लेझीम, ढोल-ताशा आणि तुतारीच्या निनादात पारंपरिक मराठी संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. यावेळी स्थानिक शेतकरी, वंचित कुटुंबातील मुले आणि दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित केलेली ‘स्पेशल चार्टर्ड फ्लाईट’मधून त्यांनी मुंबईचे हवाई दर्शन घेत आपला पहिला विमानप्रवास अनुभवला.
शुभारंभ सोहळ्याची ठळक वैशिष्ट्ये :
मजबूत नेटवर्क : इंडिगो, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि अकासा एअरने आपली सेवा सुरू केली आहे.
ड्रोन शो : विमानतळ सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला 1,515 ड्रोनचा वापर करून ‘राइज ऑफ इंडिया’ थीमवर चित्तथरारक शो सादर करण्यात आला.
स्मरणिका : इंडिया पोस्टतर्फे एनएमआयए टर्मिनलचे विशेष ‘फर्स्ट फ्लाईट कव्हर’ प्रसिद्ध करण्यात आले.