नवी मुंबई ः शरद वाघदरे
नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना सोमवारी जाहीर करण्यात आली असून नव्याने महापालिकेत समाविष्ट गावांचा प्रभाग चौदामध्ये समावेश करण्यात आला आहे. या गावांतून महापालिकेवर आता दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत.
दरम्यान, अंतिम प्रभाग रचनेवरही भाजपचा आक्षेप कायम असून ते न्यायालयात जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. चौदा गावांच्या समावेशानंतरही नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 28 प्रभाग कायम आहेत. यात 27 प्रभाग हे चार सदस्यांचे, तर एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे. नगरसेवकांची संख्याही 111 कायम ठेवण्यात आली आहे.
याआधी 22 ऑगस्ट रोजी प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. जवळपास अडीच हजार हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.
लोकसंख्या निकष बदलले
प्रभाग 14 मधील लोकसंख्येत बदल करण्यात आला आहे. अगोदर 44 हजार 591 लोकसंख्या होती. ती कमी करुन 41 हजार 833 करण्यात आली आहे. काही प्रभागांच्या सीमांकनामध्येही बदल झाले आहेत. सर्वात मोठा प्रभाग क्रमांक 15 हा असून 46 हजार 380 लोकसंख्येचा, तर सर्वात छोटा प्रभाग हा तीन सदस्यांचा असून त्याची लोकसंख्या 28 हजार 675 आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेमध्ये काही किरकोळ दुरुस्त्या केल्या असल्या तरीही ठराविक राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी ही प्रभाग रचना करण्यात आली आहे. नियम धुडकावून निवडणूक चोरण्याचाच हा प्रयत्न आहे. या विरोधात न्यायालयात दाद मागू.सागर नाईक, माजी महापौर
दहा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर चौदा गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट झाली आहेत, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या या गावांच्या विकासाला गती मिळणार आहे. या गावांतून दोन नगरसेवक निवडून जाणार असल्याने पायाभूत सुविधांत मोठी सुधारणा अपेक्षित आहे. सभागृहात चौदा गावांचा आवाज पोहोचणार आहे.लक्ष्मण पाटील, अध्यक्ष, चौदा गाव सर्वपक्षीय समिती