Natural Disaster Rental Home  Pudhari
मुंबई

Rental Home: पावसाळ्यात भाड्याच्या घरात पाणी गेलं तर भाडं द्याव लागेल का? जाणून घ्या कायदा काय सांगतो

Natural Disaster Rental Home: नैसर्गिक आपत्तीमुळे भाड्याचे घर राहण्यायोग्य राहिले नाही, तर भाडेकरू आणि घरमालकांचे हक्क काय आहेत, याबाबत कायद्यात स्पष्ट तरतुदी आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Natural Disaster Rental Home: पूर, भूकंप, चक्रीवादळ, आगीसारख्या नैसर्गिक आपत्ती एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. अशा वेळी केवळ घरमालकांनाच नव्हे, तर भाड्याने राहणाऱ्या कुटुंबांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. घर राहण्यायोग्य न राहिल्यास भाडे द्यावे लागेल का? घरमालक भाड्याची मागणी करू शकतो का? सिक्युरिटी डिपॉझिट परत मिळते का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

भारतात या परिस्थितीसाठी Transfer of Property Act, 1882 आणि काही राज्यांमध्ये लागू असलेल्या Model Tenancy Act, 2021 मध्ये स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाडेकरू आणि घरमालक दोघांचेही हक्क आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

घर उद्ध्वस्त झाल्यास भाडेकरूला कोणते अधिकार आहेत?

Transfer of Property Act, 1882 च्या कलम 108(B)(e) नुसार, पूर, आग, वादळ, भूकंप, हिंसाचार किंवा इतर अपरिहार्य कारणांमुळे भाड्याची मालमत्ता पूर्णपणे किंवा मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त होऊन राहण्यायोग्य राहिली नाही, तर भाडेकरूला भाडेकरार संपुष्टात आणण्याचा अधिकार आहे.

मात्र, हा करार आपोआप संपत नाही. भाडेकरूने स्वतः हा पर्याय स्वीकारून घर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो. जर भाडेकरूने त्याच घरात राहणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, तर त्याला नियमानुसार भाडे भरावे लागेल.

ही तरतूद कधी लागू होत नाही?

जर घराचे नुकसान किरकोळ असेल किंवा दुरुस्ती करून ते पुन्हा राहण्यायोग्य बनू शकत असेल, तर ही तरतूद लागू होत नाही. म्हणजेच, केवळ तात्पुरत्या नुकसानामुळे भाडेकरार रद्द होत नाही.

Model Tenancy Act काय सांगतो?

Model Tenancy Act, 2021 मध्ये नैसर्गिक आपत्तीग्रस्त भाडेकरूंना अधिक संरक्षण देण्यात आले आहे. सध्या हा कायदा उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि आसाम या राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे.

या कायद्यानुसार, नैसर्गिक आपत्तीमुळे घर राहण्यायोग्य नसेल, तर घरमालकाला ते पुन्हा राहण्यायोग्य होईपर्यंत भाडे आकारता येत नाही.

सिक्युरिटी डिपॉझिट कधी परत मिळते?

जर घराची दुरुस्ती शक्य नसेल किंवा घरमालकाने ठराविक कालावधीत दुरुस्ती केली नाही, तर भाडेकरार संपल्यानंतर 15 दिवसांच्या आत सिक्युरिटी डिपॉझिट आणि आगाऊ भरलेले भाडे परत करणे घरमालकासाठी बंधनकारक आहे.

मात्र, भाडेकरूकडे कोणतीही थकबाकी किंवा कायदेशीर देणी असल्यास ती रक्कम वजा करून उर्वरित पैसे परत केले जाऊ शकतात.

आपत्तीच्या काळात करार संपला तर काय?

Model Tenancy Act नुसार, जर निश्चित मुदतीचा भाडेकरार नैसर्गिक आपत्तीच्या काळात संपला, तर भाडेकरूच्या विनंतीनुसार घरमालकाने आपत्ती संपल्यानंतर किमान एक महिना त्याच अटी व शर्तींवर राहण्याची परवानगी द्यावी.

दुरुस्तीसाठी घरात प्रवेशाचे नियम

सामान्य परिस्थितीत घरमालकाला दुरुस्ती किंवा पाहणीसाठी घरात प्रवेश करण्यापूर्वी 24 तासांची पूर्वसूचना देणे आवश्यक असते. मात्र, नैसर्गिक आपत्तीच्या आपत्कालीन परिस्थितीत हा नियम लागू होत नाही आणि तातडीच्या दुरुस्तीसाठी घरमालकाला त्वरित प्रवेश करता येतो.

जर मुसळधार पाऊस, पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे भाड्याचे घर इतके खराब झाले की त्यात राहणे शक्य नाही, तर भाडेकरूला भाडेकरार संपुष्टात आणण्याचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र, करार आपोआप संपत नाही. भाडेकरूने तो निर्णय घ्यावा लागतो.

जर नुकसान झाले असले तरी तुम्ही त्याच घरात राहण्याचा निर्णय घेतला, तर सामान्यतः भाडे देणे सुरू ठेवावे लागते. केवळ पाणी शिरल्यामुळे भाडे आपोआप माफ होत नाही.

भाडेकरू आणि घरमालकांनी काय लक्षात ठेवावे?

नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेली परिस्थिती कोणाच्याही नियंत्रणात नसते. अशा वेळी कायद्याने दिलेले अधिकार आणि जबाबदाऱ्या समजून घेतल्यास अनावश्यक वाद टाळता येतात. घरमालक आणि भाडेकरू यांनी परस्पर संवाद ठेवून आणि कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतल्यास आर्थिक आणि कायदेशीर अडचणी कमी होऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT