मुंबई : सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. pudhari photo
मुंबई

Nashik Kumbh Mela : सिंहस्थासाठी प्रतिआखाडा 5 कोटी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कुंभच्या यशस्वी आयोजनासाठी निधी कमी पडू देणार नाही

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सोयी सुविधांसाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी, छोट्या संस्थानसाठी प्रति संस्थान 15 लाख रुपये, प्राधिकरणाच्या माध्यमातून वीज बिलांचा भरणा, शासकीय कामासाठी आखाड्याची जमीन अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.

सह्याद्री अतिथीगृहातील सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घोषणा केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह संबंधित मंत्री, अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुढे 12 वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यातही उपयोग व्हावा, अशा पद्धतीने पुढच्या वर्षीच्या कुंभमेळ्याचे नियोजन आणि तयारी सुरू आहे. कुंभमेळा निमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात स्थायी स्वरूपात विकासकामे होतील, याचाच प्राधान्याने विचार होत आहे.

कुंभमेळा हा भविष्यातही विस्तारणारा असल्याने त्या पद्धतीने व्यवस्थांची उभारणी करण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर हे देशामध्ये अत्यंत महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात कॉरिडॉरचे निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणावर सुविधा होईल. तसेच नाशिक येथील कुंड, रामकाल पथ, मंदिर, गुफा यांचाही जीर्णोध्दार करण्यात येत आहे.

संपूर्ण नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात अध्यात्म पूरक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. कुंभमेळा निमित्ताने आरोग्य व्यवस्थेचाही बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक साधू, महंत व भाविक यांना आरोग्य विषयक कुठलीही अडचण होणार नाही, याची परिपूर्ण दक्षता घेण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आखाड्यांसाठी असलेल्या जमिनीमधील काही क्षेत्र प्रतिबंधित करण्याकरिता निश्चितच विचार करण्यात येईल. मागील कुंभमेळ्यापेक्षा यावेळेच्या आयोजनामध्ये गोदावरी नदीचे स्वच्छ स्वरूप आपणाला सर्वांना दिसणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्यात येत आहे. तर, कुंभमेळ्याच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नको असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून भाविकांची सुरक्षा, सुविधा आणि आखाड्यांच्या मागण्यांबाबतही त्यांनी यावेळी निर्देश दिले. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी सादरीकरण केले.

बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह 13 आखाड्यांचे महंत व साधू उपस्थित होते. यावेळी आखाड्यांचे महंत यांनी विचार मांडले. बैठकीच्या सुरुवातीला त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या दर्शन पथाचे ई भूमिपूजन करण्यात आले.

त्र्यंबकेश्वर दर्शन पथ प्रकल्प

  • एकूण खर्च: 665 कोटी.

  • अखंड दर्शनासाठी एकेरी मार्ग प्रणाली.

  • पहिला टप्पा 275 कोटी

  • दुसरा टप्पा 390 कोटी.

  • 9,000 भाविकांची क्षमता असलेले शिव दर्शन संकुल, वातानुकूलित हॉल आणि एलईडी स्क्रीनची सुविधा.

  • 5 मिनिटांत आपत्कालीन निर्गमन क्षमता आणि एआय-आधारित गर्दी व्यवस्थापन.

  • काळ्या पाषाणातील पारंपारिक मराठा शैलीतील बांधकाम.

  • शहरातील वाहतूक कोंडीत 80% घट आणि स्थानिक विक्रेत्यांचे पुनर्वसन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT