Eknath Shinde File Photo
मुंबई

Maharashtra Politics: शिवसेना नरमली, पण भाजपचे बंडखोर अजूनही मैदानातच! एकनाथ शिंदे स्वतः ‌‘ॲक्टिव्ह मोड‌’मध्ये

नाशिक येथे भाजपने केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना उमेदवार पडू शकेल, अशी परिस्थिती असताना बंडखोर गीते बंधू अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई: मोठा भाऊ असलेला भारतीय जनता पक्ष बंडखोरी खपवून घेणार नाही, हे लक्षात घेत बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सक्रिय होऊन उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले. तथापि, भाजपमधील बंडखोरी अद्याप शमलेली नाही.

नाशिक येथे भाजपने केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना उमेदवार पडू शकेल, अशी परिस्थिती असताना बंडखोर गीते बंधू अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.

शिवसेनेने विधान परिषदेच्या निवडणुकीत जागोजागी झालेल्या बंडखोरीची तलवार म्यान केली असताना, भाजपचे बंडोबा मात्र थंडोबा होण्यास तयार नाहीत. नाशिक मतदारसंघात भाजपचे बंडखोर गणेश गीते यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मंत्री गिरीश महाजन आपल्याला वडिलांसारखे असून, नरेंद्र दराडे हे शिवसेनेने दिलेले अधिकृत उमेदवार कोणतेही काम करत नसल्यामुळे आपण अर्ज मागे घेणार नाही, असे गीते यांनी जाहीर करून टाकले आहे.

शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी बंडखोरी मागे घेण्याचे आदेश आम्ही दिले असून, आता भारतीय जनता पक्षाकडून त्याच प्रकारच्या वर्तनाची अपेक्षा असल्याचे सांगणे सुरू केले आहे. गुरुवारी (4 जून) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी 9 वाजता दोन्ही पक्ष आपापली बैठक घेणार आहेत.

एकनाथ शिंदे यांनी घेतली बैठक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपने व्यक्त केलेल्या तीव्र नाराजीची दखल घेत मंगळवारी मराठवाड्यातील नाराज आमदारांची बैठक घेतली. भाजपचे स्थानिक नेते निधी देत नाहीत, दुजाभाव करतात, अशी तक्रार करत आता आपल्याला स्वबळावर उभे राहायला हवे, असा या बैठकीतील सूर होता. त्यावर, तुमच्या भावना मला समजू शकतात. सध्या आपण युतीधर्म पाळायचा आहे, असे शिंदे यांनी संबंधितांना शांत शब्दांत सांगितल्याचे कळते.

रायगड येथे जुईली दळवी यांची बंडखोरी मागे घेण्यासाठी एकनाथ शिंदे स्वतः अलिबाग येथे गेले. त्यांनी ज्याप्रकारे हालचाली केल्या त्या लक्षात घेता आता भाजपनेही तसाच प्रतिसाद द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. मित्राने मित्रासारखे वागावे, अशी अपेक्षा शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात येत होती.

राष्ट्रवादीतील बंडखोरी शमली

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षानेही अंतर्गत बंडखोरी शमवली आहे. त्या पक्षाचे सुनील टिंगरे यांनी अर्ज मागे घेतला. मात्र, भाजप नेत्यांच्या मनात काय आहे, बंडखोर आपले उमेदवारी अर्ज मागे घेणार की नाहीत, याबद्दल साशंकता व्यक्त केली जाते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT