मुंबई

Nana Patole : महापुरुषांबाबत भाजप नेत्यांचे खायचे व दाखवायचे दात वेगळे : नाना पटोले

अविनाश सुतार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : निवडणुकीवेळी महापुरुषांचे आशीर्वाद घेऊन मतांची भीक मागणारे भारतीय जनता पक्षाचे नेते निवडणुका संपल्यानंतर मात्र याच महापुरुषांचा अपमान करतात. महाराष्ट्रात राहूनच महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करण्यात भाजपा नेत्यांमध्येच स्पर्धा लागल्याचे दिसत आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या या नेत्यांवर भाजपने कारवाई केली नाहीच; पण साधा निषेध करण्याचे अथवा समज देण्याचे सौजन्यही दाखवले नाही, उलट या 'महनीय' व्यक्तींना पंतप्रधानांच्या बाजूला सन्मानाने उभे केले जाते, हा महाराष्ट्राचा व आमच्या दैवतांचा अपमानच आहे. भाजपचे महापुरुषांच्याबाबत खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत, हेच यातून दिसत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले  (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूरमधील कार्यक्रमात शेजारी सन्मानाने बसवले. महापुरुषांचा अपमान करणाऱ्याला पंतप्रधान मोदींनी चार खडेबोल सुनावले असते. तर पंतप्रधानांबद्दल आम्हाला आदरच वाटला असता. पण महापुरुषांपेक्षा भाजपाला त्यांचे नेते मोठे वाटतात. असेच खेदाने म्हणावे लागत आहे. महापुरुषांची बदनामी करण्याचे हे भाजपचे नियोजित षड्यंत्र असून महापुरुषांची बदनामी करण्याचा भाजपचा अजेंडा राज्यपाल चालवत आहेत, असा आरोपही त्‍यांनी या वेळी केला.

Nana Patole : चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले ; उपचाराची गरज

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याच्या प्रकाराचे आम्ही समर्थन करत नाही; पण याप्रकारानंतर दहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. तर या घटनेचे वार्तांकन व व्हिडीओ शूट करणाऱ्या पत्रकाराला ३०७ सारखी कलमे लावून अटक करायला लावली. चंद्रकांत पाटील हे महापुरुषांपेक्षा मोठे आहेत का? त्या पत्रकारावर एवढी कठोर कलमे लावण्याची खरेच गरज होती का? पण सूडभावनेने पेटलेल्या सरकारने तत्परतेने कारवाई केली. पण महापुरुषांचा वारंवार अपमान करणाऱ्या नेत्यांवर भाजपाने कारवाई केलेली नाही.

चंद्रकांत पाटील यांनी माझ्यासह काही राजकीय नेत्यांवरही आगपाखड केली. माझा ऐकरी उल्लेख करुन मलाच चर्चेचे आव्हान दिले. चंद्रकांत पाटील यांची आगपाखड पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे दिसत असून, त्यांची आम्हाला चिंता वाटत आहे. त्यांनी लवकर चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. चंद्रकांत पाटील व भाजपाच्या वाचाळ नेत्यांना गणपती बाप्पा सुबुद्धी देवो, अशी मी प्रार्थना करतो, असेही नाना पटोले म्हणाले.

हेही  वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT