नाना पाटेकरांचे एक ना अनेक डायलॉग असलेले रिल्स व्हायरल होत आहेत. मात्र, काळजाला हात घालणारा त्यांचा ताजा व्हीडिओ ठरला तो गोव्यातलाच. गेल्या ४ ऑक्टोबरच्या रात्री गोव्यातील एका कार्यक्रमात जणू त्यांना शेवटाचा संकेत मिळाला आणि तो त्यांनी बोलूनही दाखवला. त्यानंतर ते आपल्या गोव्यातील निवासस्थानी पोहोचले आणि पहाटे जागतिक रंगभूमीचा त्यांनी निरोप घेतला. नानांचे बुधवारी रात्रीचे मृत्यूबद्दलचे चिंतन मात्र पाठ सोडण्यास तयार नाही. ते त्यांच्याच शब्दांत-
आपण किती जगणार, काय जगणार, आपल्याला काहीच माहिती नसते. जन्माला आल्यापासून मित्र नाही, आई वडील, भाऊ नाही, कोणी आपल्याबरोबर नसतो. मृत्यूमात्र सतत आपल्याबरोबर आहे. जो आपल्या बरोबर आहे, त्याची भीती का वाटावी, तो आतासुध्दा माझ्याबरोबर आहे. तो मला म्हणाला, नाना चलायचं का?
मनोहर पर्रीकर माझे मित्र. मनोहर पर्रीकर मोठा माणूस, अभिमान वाटावा असा माणूस. त्याच्याकडे मान वर करूनच पहावे लागायचे, आपले दुर्दैव की तो फार लवकर गेला. मी वयाची ७६, वर्षे पूर्ण केली. आपलं नशीब आपल्या इथं अशी माणसं जन्माला आली. वसा आणि ध्यास घेतल्यासारखी मनोहर पर्रीकर यांच्यासारखी माणसं जगली. प्रत्येकाला जायचं आहे, मी उद्या आहे, नाही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात तो काळ येणारच. पण त्याच्या आधी मला जे करायचे ते मी करू शकतो का, त्यासाठी मी प्रयत्न केले का, का माझे आयुष्य माझी बायको, माझी मुले माझे घर यांच्यापुरते मर्यादित असेल तर फक्त जग आणि मर, एवढचं करावं....
मी माझी लाकडे काढून ठेवली आहेत
साधारणपणे तीन वर्षांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नानांनी आपल्या अंत्यविधीची तयारी आपणच कशी करून ठेवली आहे, ते सांगितले. असे बोलण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने ते तेव्हा फारसे लक्षात आले नाही. त्यांच्या या बोलण्यालाही उपहासाची एक किनार होती. त्यातून मानवी दुःखाचे दाहक सत्यच ते सांगून गेले. नाना म्हणाले होते-
शेवटी मला बारा मण लाकडे लागतील. ही लाकडे मी आधीच गोळा करून ठेवली आहेत. ही बारा मण लाकडे सुकलेली आहेत. त्यात माझे दहन संस्कार करा. ओली लाकडे वापरू नका. ओली लाकडे वापरली तर धूर होईल, अंत्यविधीला आलेल्या मित्रांच्या डोळ्यांतून पाणी आले तर ते माझ्यासाठी रडत आहेत असा उगाच गैरसमज व्हायचा! किमान मरताना तरी असा गैरसमज व्हायला नको.