नाना पाटेकर file photo
मुंबई

रंगभूमीवरचा नटसम्राट - नाना पाटेकर

रंगभूमीवरचा नटसम्राट -नाना पाटेकर

पुढारी वृत्तसेवा

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अजरामजर ठसा उमटविणाऱ्या नाना पाटेकर यांच्या अभिनयाची कारकीर्द रंगमंचापासूनच झाली. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात नाटकांतून भूमिका केलेल्या नाना यांना रंगभूमीचे आकर्षण होतेच. त्यातून राज्य नाट्य स्पर्धेसाठी त्यांनी विजय तेंडुलकर यांचे तेथे पाहिजे जातीचे हे नाटक केले. आविष्कार' संस्थेने १९७६ मध्ये केलेल्या बबन्याची भूमिका गाजली. या नाटकाला यश मिळाले. आविष्कारमध्ये सुलभा आणि अरविंद देशपांडे यांच्यासारख्या दिग्गजांसमवेत काम करणाऱ्या नानांमधील अभिनेत्याला रंगकर्मी, दिग्दर्शिका विजया मेहता यांनी पैलू पाडले. त्यातूनच नाना पाटेकर यांच्यासारखा खऱ्या अर्थाने नटसम्राट रंगभूमीला मिळााला.

नाना यांच्या रंगमंचीय कारकीर्दीत महत्वपूर्ण ठरलेले महासागर १९७९ मध्ये रंगमंचावर आले. जयवंत दळवी लिखित आणि विजया मेहता दिग्दर्शित या नाटकात नाना यांनी एका इन्शुरन्स एजंटची भूमिका केली होती. त्यानंतर वर्षभरातच विजया मेहता यांच्या दिग्दर्शनातीलच अनिल बर्वे यांनी लिहिलेल्या हमीदाबाईची कोठी रंगमंचावर आले. या नाटकात ग्रामोफोनच्या रेकॉर्डसमुळे कोठ्यावर गाणाऱ्या अभिजात गायिकांची होणारी तगमग आणि शोकांतिका मांडली आहे. त्यात नाना यांनी हमीदाबाई यांनी वाढवलेल्या एका अनाथ मुलाचे-सत्तारचे पात्र त्यांनी साकारले होते. मनाने हळवा, पण तितकाच बेधडक, टपोरी गुंड त्यांनी साकारला होता.

त्यांच्या या भूमिकेचे कौतुक झालेच. पण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, भारती आचरेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकारांसमवेत मैत्रीचे धागेही जुळले. त्याचे अनेक किस्से नाना पाटेकर यांनी अनेक मुलाखतीमधून सांगितले आहेत. याच कालावधीत रंगमंचावर जयवंत दळवी यांच्या पुरूष नाटकात नाना यांनी क्रूर, वासनांध आणि भ्रष्ट राजकारणी असलेला गुलाबराव मूर्तीमंत रूपात उभा केला. पुरूष नाटकाचे त्यांनी सुमारे १६०० प्रयोग केले. नाटक सोडल्यानंतर काही काळ त्यांनी समांतर चित्रपटातून भूमिका साकारल्या, पण प्रहार चित्रपटाच्या निर्मितीनंतर आयुष्यात स्थिरावण्यासाठी व्यावसायिक चित्रपटांकडे वळल्याने नाटक करू शकलो नाही, ही खंत त्यांच्या मनात होती.

हमीदाबाईची कोठीत काम करतांना नाना यांना एका प्रयोगासाठी ५० रूपये मिळायचे, तर अशोक सराफ यांना २५० रूपये. आम्ही सर्व कलाकार पत्ते खेळायचो. त्यावेळी अशोक सराफ आम्हा सहकलाकारांना पैसे मिळावेत म्हणून मुद्दाम हरायचे आणि आम्हांला पैसे मिळवून द्यायचे. मी कधी कधी त्यांच्या डोक्याला मसाज करायचो, त्याचेही ते ५ रूपये द्यायचे, मी ते घेत असे, त्यानंतरही अशोक सराफ भेटले की त्यांच्या डोक्याला मसाज करून पैसे घ्यायचो, खिशातून पैसे काढून पैसे देत ते म्हणत आता रेट वाढला आहे, अशी अशोक सराफ यांची आठवण नाना पाटेकर यांनी अनेक मुलाखतीमधून जाहीररीत्या सांगितली आहे.

मृत्यूची भीती...

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा खऱ्या अर्थाने नटसम्राट ठरलेल्या नाना पाटेकर यांना रंगमंचावर वि. वा. शिरवाडकर लिखित नटसम्राटमधील गणपत बेलवलकर हे पात्र साकारण्यासाठी विचारणा झाली होती. पण या पात्रासाठी लागणारी ऊर्जा खर्च केल्यास आपला लवकरच मृत्यू होईल, अशी भीती वाटत असल्याने आपण नटसम्राट नाटकाला नकार दिल्याचे नाना यांनी सांगितले होते. मात्र महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट चित्रपटात त्यांनी अप्पा उर्फ गणपत बेलवलकरची भूमिका साकारली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT