Nair Hospital Nurses Pudhari
मुंबई

Nair Hospital Nurses: नर्सेसना फक्त 81 रुपयांत नाश्त्यासह दोन वेळचे जेवण; दर्जाबाबत स्थायी समितीत प्रश्न

नायर हॉस्पिटलमधील 300 शिकाऊ परिचारिकांसाठी निविदा; कमी दरामुळे अन्नाच्या गुणवत्तेवर सर्वपक्षीय सदस्यांची शंका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या नायर हॉस्पिटलमधील शिकाऊ परिचारिकांसाठी एका ठेकेदाराने विविध करांसह अवघ्या 81 रुपयांमध्ये दोन वेळच्या जेवणासह अल्पोपाहार (नाश्ता) देण्याची तयारी दर्शवली आहे. 150 रुपयांपर्यंत कमीत कमी खर्च येत असताना 81 रुपयांत ही सेवा देणार असल्याने दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनीही याबाबत शंका व्यक्त करीत हा प्रस्ताव मंजूर केला आहे.

मुंबई महानगरपालिका नायर धर्मादाय हॉस्पिटलमधील शिकाऊ परिचारिकांना दररोज चहा, अल्पोपाहार व दोन वेळचे जेवण देते. येणाऱ्या 1095 दिवसांकरिता नायर हॉस्पिटलमधील 300 शिकाऊ परिचारिकांसाठी दोन वेळच्या जेवणासह अल्पोपाहार व चहा दिला जाणार आहे. यासाठी मागवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये चार ठेकेदारांनी सहभाग घेतला. यात ए. ए. एम. चेरुवत्तम या ठेकेदाराने एका नर्ससाठी दोन वेळचे जेवण, चहा व अल्पोपाहार अवघ्या 81 रुपयांमध्ये देण्याची तयारी दर्शवली आहे. याच वेळी अन्य ठेकेदारांनी 86 रुपये 50 पैसे ते 219 रुपये दर निविदांमध्ये नोंद केला होता. एक वेळचे जेवण पकडले तरी सरासरी 60 ते 70 रुपये खर्च अपेक्षित असतो. अल्पोपाहार व चहा यांचा कमीत कमी दर 30 ते 35 रुपये इतका असतो. त्यामुळे दोन वेळचे जेवण, चहा व अल्पोपाहार यांचा खर्च एका नर्समागे सरासरी 180 रुपये ते 190 रुपये खर्च येणे अपेक्षित आहे.

हा दर अगदी कमीत कमी पकडला तरी 140 ते 150 रुपये इतका येऊ शकतो. पण सर्व करांसह 81 रुपये ठेकेदाराला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे जेवण व अल्पोपाहार यांचा दर्जा घसरण्याची शक्यता आहे.

स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर

स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीतील सर्वपक्षीय सदस्यांनी कमी दराने पुरवठा करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली. शिकाऊ परिचारिकांना नेमके कोणते अन्न देणार, त्याच्या दर्जाबाबत कोणाचे नियंत्रण असणार, यावर स्पष्टीकरण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अखेर स्थायी

समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सदस्यांच्या मागणीची दखल घ्यावी, असे प्रशासनाला निर्देश देत प्रस्ताव मंजूर केला. 300 नर्सेसला 1,095 दिवस जेवण व अल्पोपाहार पुरवण्यासाठी महापालिकेला अवघा 2 कोटी 66 लाख रुपये खर्च येणार आहे. सध्या हा खर्च प्रतिनर्स 65 रुपये इतका येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT