मुंबई: नायगाव येथील बीडीडी चाळींतून पुनर्विकसित इमारतींमध्ये राहायला गेलेल्या रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. याबाबत म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच चर्चा पार पडली.
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास सुरू आहे. नायगाव येथील नव्या घरांमध्ये सध्या शेकडो रहिवासी वास्तव्यास आले आहेत. त्यांना पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
सहा लाख लीटर पाणी पुरवठ्याची गरज असताना पालिकेकडून साडे चार लाख लीटर पाणी पुरवठा केला जात आहे. मुळातच पाणी पुरवठा आणि सध्या सुरू असलेली १० टक्के पाणीकपात यामुळ रहिवासी त्रस्त आहेत.
नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल’असे नामकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पात दोन पुनर्वसन इमारतींत एकूण २० टॉवर बांधण्यात येत आहेत.
यात पुनर्विकास प्रकल्पाच्या पुनर्वसन इमारत क्रमांक १ मधील एकूण ८ टॉवर्सपैकी ५ टॉवर्समधील ८६४ सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ मार्चला करण्यात आले होते. त्यानंतर ५ जूनपासून आणखी ५३७ घरांचे वितरण करण्यात आले.