मुंबई: सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ अपलोड करण्याची धमकी देऊन एका वयोवृद्ध व्यावसायिकाला ब्लॅकमेल करुन ७५ लाखांची खंडणी वसुलीचा प्रकार नागपाडा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन महिलांसह चौघांविरुद्ध नागपाडा पोलिसांनी खंडणीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
शफीक हनीफ शेख, मुस्कान रफिक शेख, मिनू मुमताज आणि राजेंद्र उत्तेकर अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. यातील तक्रारदार नवी मुंबईतील खारघर परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचा नागपाडा येथे एक फ्लॅट आहे.
सात वर्षांपूर्वी त्यांची खारघरचे रहिवासी असलेल्या शफीक शेख आणि मुस्कान शेखशी ओळख झाली होती. त्यांच्या मार्फत मिनू आणि राजेंद्र परिचित झाले होते. नागपाडा घरी असताना या आरोपींनी संगनमत करुन त्यांच्याशी मिनूशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्यातील अश्लील व्हिडीओ बनवून ते व्हिडीओ दाखवून त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. पैसे दिले नाहीतर त्यांचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करुन त्यांच्या बदनामीची धमकी दिली होती.
बदनामीच्या भीतीने त्यांनी त्यांना टप्याटप्याने ७५ लाखांची खंडणी दिली . तरीही ते त्यांच्याकडे सतत पैशांची मागणी करत राहिले आणि शेवटी प्रकरण नागपाडा पोलिसांंत पोहोचले.शफीक आणि मुस्कान हे दोघेही नवी मुंबईतील खारघर तर राजेंद्र हा मुलुंड परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.