MVA seat sharing meeting Pudhari
मुंबई

MVA seat sharing meeting: आज मविआची जागावाटपासाठी बैठक; राजकीय हालचालींना वेग

या बैठकीला काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी (शप) कडून शशिकांत शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे उपस्थित राहणार असल्याचे समजते.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या 17 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत खलबते सुरू झाली आहेत. महायुतीच्या जागवाटपाचे सूत्र अंतिम करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटात आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू आहे; तर महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र ठरविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मुंबईत होणाऱ्या या बैठकीत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी (शप) कडून शशिकांत शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे उपस्थित राहणार असल्याचे समजते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघातून निवडून द्यायच्या राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रमांची घोषणा अलीकडेच केली. त्यानुसार येत्या 18 जून रोजी या मतदारसंघासाठी निवडणुका होणार असून यासाठी सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

या निवडणुकीसाठी शनिवारी महायुतीच्या प्राथमिक जागावाटपाबाबत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँगेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक पार पडली. ही निवडणूक महायुती म्हणून एकत्रितरीत्या लढण्याचे धोरण महायुतीने नक्की केल्याचे समजते. मात्र, या 17 जागांपैकी तिन्ही पक्षांच्या वाट्याला किती जागा येतात, यावरून रस्सीखेच सुरू आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीही ही निवडणूक एकत्रितरीत्या लढविणार असल्याचे मानले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता एकत्र लढल्यास काही ठिकाणी लढत देता येणार असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे आता तिन्ही पक्षांत जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यासाठी प्रमुख नेत्यांची बैठक सोमवारी बोलवण्यात आली आहे. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे आणि ठाकरे गटाकडून अंबादास दानवे उपस्थित राहणार असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT