MVA Pudhari
मुंबई

MVA Legislative Council: विधानपरिषद उमेदवारीवरून मविआत धुसफूस; काँग्रेसच्या निर्णयावर ठाकरे, पवार गट नाराज

नागपूर पदवीधर, पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेसने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने वाद; अमरावती, संभाजीनगरची जागा लढवण्यावर ठाकरे गट ठाम

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: काँग्रेसने परस्पर नागपूर, पुणे शिक्षक , अमरावती शिक्षक या विधानपरिषदेच्या तीन जागांवर परस्पर उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे महाविकास आघाडीत अंतर्गत मतभेद निर्माण झाले आहेत.

विधानपरिषदेच्या ३ पदवीधर (नागपूर, पुणे, संभाजीनगर) आणि दोन शिक्षक मतदारसंघात (पुणे, अमरावती) काँग्रेसने आघाडीतील दोन पक्षाच्या नेत्यांना विश्वासात न घेता परस्पर ३ जागा जाहीर केल्या आहेत.

नागपूर पदवीधर - अभिजित वंजारी, पुणे शिक्षक - जयंत आसगावकर आणि अमरावती शिक्षक - अदिती पोहरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यावरून आम्हाला विश्वासातच घेतलं नाही, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

ठाकरे गटाने अमरावती शिक्षकसाठी महिन्यापासून तयारी केली होती. दत्तात्रय लहाने यांचं नाव आधीच ठरलं होते.काँग्रेसने ऐनवेळी दगा दिला असल्याचा त्यांचा आरोप आहे.

पुणे पदवीधरमध्ये ठाकरे गटाचे सुनील मोदी यांनी ५३ हजार नोंदणी केली, तरी समन्वयासाठी आम्ही ती जागा सोडायला तयार होतो, पण अमरावती आम्ही सोडणार नाही, असे राऊत म्हणाले. संभाजीनगर पदवीधर जागेवर शरद पवार गट आणि ठाकरे गट या दोघांचा दावा केला आहे.

शनिवारी दुपारी २ वाजता मुंबईतील ग्रँड हयात मविआ बैठक झाली. हर्षवर्धन सपकाळ (काँग्रेस), शशिकांत शिंदे (पवार गट), संजय राऊत (ठाकरे गट) हे नेते उपस्थित होते.पण या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही, असे सांगण्यात आले.

काहीही झालं तरी आम्ही अमरावती शिक्षक आणि संभाजीनगर पदवीधर लढणारच, असे संजय राऊत यांनी सांगितले. आम्हालाही पक्ष चालवायचा आहे. एकमत झालं नाही तर मैत्रीपूर्ण लढत होईल, असे ते म्हणाले. उद्या रविवारी पुन्हा आघाडीची बैठक होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT