नरेश कदम
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 18 रिक्त जागांसाठी निवडणूक होत असून या जागांसाठी महाविकास आघाडीकडून काही जागांवर दावे केले जात आहेत. बीडसह काही जागांवर मविआकडे मतदारांची वानवा आहे. त्यामुळे अशा जागांवर निवडणूक लढावयाची की नाही, असा प्रश्न मविआच्या नेत्यांना पडला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठवायच्या 18 जागांसाठी 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन- अडीच वर्षं न झाल्याने विधान परिषदेच्या 18 जागा जागा रिक्त होत्या.
यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेवर निवडून गेले, त्यामुळे नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा रिक्त झाली. नागपूर, छत्रपती संभाजीनगर-जालना, धाराशिव-लातूर-बीड, अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, नाशिक, परभणी-हिंगोली, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, जळगाव, भंडारा-गोंदिया, पुणे, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, ठाणे-पालघर, अहिल्यानगर, सोलापूर या जागांवर निवडणूक होणार आहे.
महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप नंबरचा पक्ष असून शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठाणे-पालघर , छत्रपती संभाजीनगर-जालना - रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग , नाशिक यवतमाळ या जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे. शिंदे गटाचे 12 आमदार सध्या विधानपरिषदेत आहेत. आणखी पाच आमदार विधानपरिषदेवर पाठवून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचे शिंदे यांचे प्रयत्न आहेत.
यात ठाणे पालघरची जागा त्यांनी प्रतिष्ठेची केली आहे. पण भाजपचे या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वाधिक सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपने या जागेवर दावा ठोकला आहे. राज्याच्या नेतृत्वाने ही जागा देण्यास नकार दिल्याने एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेले होते. परंतु ही भेट झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर-जालना ही जागा पूर्वी शिवसेनेने लढवली होती तसेच शिंदेंचे आमदार या क्षेत्रात आहेत. पण भाजपचे संख्याबळ येथे जास्त असल्याने त्यांनी ही जागा सोडण्यास नकार दिला आहे. भाजप जालन्यातील शरद पवार गटातील एका बड्या नेत्याला गळाला लावणार असल्याचे बोलले जात आहे.
तो नेता भाजपमध्ये आला तर ते भाजपचे उमेदवार असतील. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर शिंदे आणि सुनील तटकरे हे आपल्या गटासाठी आग्रही आहेत. नाशिक आणि यवतमाळ या जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे. सुनेत्रा पवार गटाने पुणे, अहिल्यानगर, सांगली सातारा, हिंगोली परभणी आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जागांवर दावा केला आहे. पुणे, सांगली सातारा, अहिल्यानगर या जागा भाजप स्वतः लढवेल असे दिसत आहे.
महाविकास आघाडीत निरुत्साह
वर्धा-चंद्रपूर -गडचिरोली, धाराशिव -लातूर -बीड, अमरावती -भंडारा -गोंदिया आणि सांगली, सातारा या जागा काँग्रेस लढवेल. तर शरद पवार गट जालना- छत्रपती संभाजीनगरसह काही जागा लढणार आहे. तर उद्धव ठाकरे गटाची ताकद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगण्य आहे. रत्नागिरी -सिंधुदुर्ग- रायगड, ठाणे- पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे उद्धव ठाकरे गटाची ताकद होती.
पण नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई वगळता ठाकरे गटाची ताकद अत्यंत कमी झाली आहे. काही जागांवर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनुमोदन म्हणून देण्यासाठी सदस्य नाहीत. त्यामुळे महायुतीला फारशी टक्कर देण्याची महाआघाडीकडे ताकद नाही