मुंबई : महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयाची गोडी लागावी तसेच विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेणे शक्य व्हावे, यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग आणि संपर्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शनिवारी गोखले रोड (दादर) महानगरपालिकेच्या शाळेत सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्गखोल्यांना भेट दिली.
स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्ता वाव मिळेल. तसेच सोप्या पद्धतीने संकल्पना आत्मसात करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
प्रशिक्षणार्थींसोबत संवाद साधताना गगराणी म्हणाले की, अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करावा. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक संकल्पना सहजपणे कळाव्यात यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले. याप्रसंगी शिक्षण अधिकारी (प्राथमिक) संदीप सांगवे, प्रशासकीय अधिकारी (शाळा) स्नेहलता डुंबरे तसेच विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 181 शाळांमध्ये 181 स्मार्ट टेलिव्हिजन तसेच शैक्षणिक संकल्पना आधारित उपकरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणित तसेच इंग्रजी भाषेतील संकल्पना चलचित्रपटाच्या माध्यमातून स्मार्ट टेलिव्हिजनवर मांडणे शक्य होणार आहे.
दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी 181 शाळांमधील प्रत्येकी एक यानुसार शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. प्राथमिक विभागाच्या शिक्षकांची निवड या प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
आषाढी एकादशी वारीनिमित्त छोट्या वारकर्यांच्या दिंडीचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. या दिंडीत छोट्या वारकर्यांसोबत पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सहभाग घेतला. तसेच यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत अक्षर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.