मालाड : महानगरपालिकेकडून धूर फवारणी होत नसल्याची तक्रार केल्याचा राग धरून पालिका कर्मचाऱ्याने तक्रारदारालाच धमकावल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी घडला. या प्रकरणी संबंधित तक्रारदाराने पालिका सहाय्यक आयुक्त के-ईस्ट विभाग तसेच विलेपार्ले पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
उत्कर्ष बोरले यांनी दिनांक 22 रोजी के-ईस्ट विभागातील कीटक नियंत्रण अधिकाऱ्यांकडे त्यांच्या परिसरात आणि दुर्वांकुर इमारतीत नियमित धूर फवारणी होत नसल्याची लेखी तक्रार केली होती. डासांच्या प्रादुर्भावामुळे त्यांच्या दोन वर्षीय चिमुकलीच्या हातावर व पायावर गंभीर इजा झाल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. यानंतर धूर फवारणी करण्याची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, या तक्रारीसंदर्भात दिनांक 23 रोजी दैनिक पुढारी मध्ये वृत्त प्रकाशित होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांना विलेपार्ले येथील दुर्वांकुर इमारतीत पाठवले. मात्र याचाच राग धरून पालिका कर्मचारी म्हणून आलेल्या एका व्यक्तीने तक्रारदारालाच धमकावले असे तक्रारीत म्हंटले आहे.
शुक्रवारी सकाळी 11.37 वाजता एक इसम पालिका कर्मचारी असल्याचे सांगत इमारतीत आला. स्वतःचे नाव देवराजन पलीकुंडा असे सांगून ‘ पुन्हा धूर फवारणीची तक्रार करू नकोस, नाहीतर बघून घेईन,’ असे म्हणत दोन वेळा शिवीगाळ करून तो निघून गेला. सदर इसम एकटा नसून त्याच्यासोबत पांढरा शर्ट घातलेला आणखी एक इसम होता.