मुंबई : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल लागले असून मागील निवडणुकीचा विचार करता परभणी आणि नांदेड महापालिका काँग्रेसने गमावली आहे. तर, भाजपाने लातूर आणि चंद्रपूर महापालिका गमावली आहे.
मावळत्या चंद्रपूर महापालिकेत भाजपाने 66 पैकी 36 जागा जिंकल्या होत्या. यावेळी मात्र भाजपची 23 जागांवर घसरगुंडी झाली आहे. काँग्रेसने 27 जागा जिंकल्या आहेत. उबाठा शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी आहे.
लातूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. तेथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विषयी केलेले वक्तव्य भाजपाला महागात पडल्याचे सिद्ध झाले आहे. लातूरमध्ये गेल्यावेळी भाजपाने 36 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपला 22 जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसने 70 पैकी 43 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
मावळत्या नांदेड - वाघाळा महापालिकेत काँग्रेसच्या 81 पैकी तब्बल 73 जागा निवडून आल्या होत्या. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात गेल्याने सत्ता देखील भाजपाकडे स्थलांतरित झाली आहे. भाजपाने 45 जागा जिंकत बहुमत मिळविले आहे. काँग्रेस 10 जागांवर घसरली आहे. तर परभणी महापालिकेत मागील निवडणुकीत 65 पैकी 31 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. काँग्रेसचा महापौर झाला होता. पण यावेळी काँग्रेसची संख्या घटली असून उबाठा शिवसेनेला काँग्रेसच्या मदतीने राज्यात एकमेव सत्तेची संधी आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका गमावली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत 84 जागा जिंकत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या मदतीने सत्ता राखली होती. पण, या निवडणुकीत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईची सत्ता उद्धव ठाकरेंकडून ताब्यात घेतली आहे. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येऊनही त्यांना भाजपाला रोखता आले नाही.