मुंबई : मुंबई शहर व उपनगरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे झेब्रा क्रॉसिंगसह स्टॉप लाईन व लेन मार्किंग लाईन पुसल्या गेले आहेत. त्यामुळे महापालिकेने नव्याने तयार झालेल्या सिमेंट काँक्रेटच्या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगसह लेन मार्किंग व स्टॉप लाईन मारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेच्या विभाग कार्यालयनिहाय कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे सुरू असून झेब्रा क्रॉसिंग व लेन मार्किंग फारसे कुठे दिसून येत नाही. त्यामुळे वाहन चालकांना नियमांचे पालन करता येत नाही. नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग पूर्वी मारण्यात आलेल्या स्टॉप लाईनच्या मागे वाहने उभी राहणे अपेक्षित असते. पण स्टॉप लाईन व झेब्रा क्रॉसिंग दिसत नसल्यामुळे वाहने थेट पुढे येतात. त्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एवढेच काय तर लेन मार्किंग नसल्यामुळे गाड्या एका लेनमध्ये चालत नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. याबाबत अनेक तक्रारी केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने नवीन सिमेंट काँक्रेट रस्ते बनवल्यानंतर त्या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगसह लेन मार्किंग स्टॉप लाईन रंगवण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण मुंबईतील काळबादेवी, चिराबाजार, मरीन ड्राईव्ह, चंदनवाडी व अन्य भागातील रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग व लेन मार्किंग मारण्यासाठी विभाग पातळीवर कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने करण्यात येणाऱ्या या कामासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे सहा लाख रुपये खर्च केले जात आहेत. याच पद्धतीने पालिकेच्या अन्य विभागामध्येही कंत्राटदार नेमून रस्त्याची कामे पूर्ण झाल्यानंतर झेब्रा क्रॉसिंग व लेन मार्किंग मारण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात १५० किमी पेक्षा जास्त रस्त्यांची कामे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे असत्या रस्त्यांच्या नाक्यावर व सिग्नल जवळ झेब्रा क्रॉसिंग मारले जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
१० कोटी पेक्षा जास्त तरतूद
रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग लेन मार्किंग व स्टॉप लाईन मारण्यासाठी १० कोटी रुपयापेक्षा जास्त निधी तरतूद करण्यात आला आहे. त्यामुळे यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. झेब्रा क्रॉसिंग व अन्य कामांसाठी पालिका प्रशासनाला खर्च करण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला असल्याचेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.