मुंबई: पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील एका २५ वर्षीय तरुणी पायलटने तिच्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत महिलेचा दिल्लीस्थित प्रियकर आदित्य पंडित (वय 27) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत तरुणी सृष्टी तुल्ली एअर इंडियामध्ये पायलट म्हणून काम करत होती. अंधेरी पूर्व येथील मरोळ येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणारी ही तरुणी मूळ उत्तर प्रदेशातील गोरखपूरची आहे. मिळालेल्या माहितीनुसार 25 नोव्हेंबररोजी ती घरात मृतावस्थेत आढळली होती.
मूळचा दिल्लीचा राहणारा २७ वर्षीय आरोपी मागील दोन वर्षांपासून मृत तरुणीच्या संपर्कात होता. तरुणीच्या घरच्यांनी आरोप केला आहे की, तिचा प्रियकर तिची छळ करत होता आणि तिला मारहाणही करत होता. तिच्या मैत्रिणीने देखील आरोप केला आहे की, प्रियकर तिला खूप छळायचा. त्यामुळे या सर्व छळांना कंटाळून तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान या प्रकरणी प्रियकराला पोलिसांनी अटक केली असून त्याची पुढील चौकशी सुरू आहे.