Youth dies in Mazgaon
मुंबई, माझगाव येथे सहाव्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून झोपेत असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. File Photo
मुंबई

मुंबई: झोपेत चालत जाऊन तरुणाचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईमधील माझगाव येथे उंच इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून झोपेत चालत गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. मुस्तफा इब्राहिम चुनावाला असे मृत तरुणाचे नाव आहे. माझगावच्या नेस्बिट रोड येथील एक्वा जेम टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावर मुस्तफाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला तातडीने चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

बाल्कनीत जाळी नसल्यामुळे तो झोपेत कोसळला

याबाबत भायखळा पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुस्तफा हा मागील काही दिवसांपासून निद्रानाशाने त्रस्त होता. घराच्या बाल्कनीत लोखंडी जाळी नसल्यामुळे तो झोपेत असताना खाली कोसळला. याबाबत आमची कोणावरही तक्रार किंवा संशय नाही, असे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. मुस्तफाने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) दिली होती. त्याला 517 गुण मिळाले होते, असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मुस्तफाला सोम्नॅम्ब्युलिझम म्हणजे स्लीपवॉकिंग हा विकार

मुस्तफाला सोम्नॅम्ब्युलिझम म्हणजे स्लीपवॉकिंग हा विकार होता. ज्यामुळे लोक झोपेत असताना फिरतात किंवा अनपेक्षितपणे हालचाल करतात. या विकारावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते या आजाराने ग्रस्त असलेल्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. ते झोपेत बाहेर फिरू नये म्हणून दारे आणि खिडक्या बंद असल्याची खात्री करा. स्लीपवॉकरचा मार्ग फर्निचर किंवा तीक्ष्ण वस्तूंपासून दूर ठेवा. ज्यामुळे ट्रिपिंग किंवा इजा होण्यापासून बचाव होईल. बाल्कनीमध्ये सुरक्षा जाळ्या लावा. औषधे आणि इतर धोकादायक वस्तू दूर ठेवा.

SCROLL FOR NEXT