Western Railway AC Local Increase Pudhari
मुंबई

Western Railway AC Local Increase: शिवजयंतीपासून मुंबईकरांना गारेगार दिलासा; पश्चिम रेल्वेच्या 12 एसी व 3 नव्या लोकलची भर

19 फेब्रुवारीपासून एसी फेऱ्यांत मोठी वाढ; 121 वरून 133 सेवांसह वीकेंड प्रवास अधिक आरामदायी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजेच 19 फेब्रुवारीपासून 12 अतिरिक्त एसी लोकल सेवा आणि 3 नवीन नॉन-एसी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

वातानुकूलित प्रवासाची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन आणि सामान्य प्रवाशांसाठी परवडणाऱ्या पर्यायांची गरज ओळखून, पश्चिम रेल्वेने ही योजना आखली आहे. या 12 लोकल सेवांमध्ये 11 लोकल विद्यमान नॉन-एसी सेवांची जागा घेतील, तर एक नवीन एसी सेवा असेल. याव्यतिरिक्त, तीन नवीन नॉन-एसी सेवा देखील सुरू केल्या जात आहेत. या वाढीसह, एकूण एसी सेवांची संख्या 121 वरून 133 पर्यंत वाढेल. शनिवार आणि रविवारी चालवल्या जाणाऱ्या एसी सेवांची संख्या देखील 77 वरून 106 पर्यंत वाढेल आणि त्यामुळे आठवड्याच्या शेवटी म्हणजेच वीकेंडला प्रवास करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना अधिक आरामदायी आणि गारेगार प्रवास करता येणार आहे.

हार्बरवरही ‌‘एसी‌’ला प्रतिसाद

‌‘मध्य रेल्वे‌’च्या हार्बर मार्गावर 26 जानेवारी 2026 पासून 14 नवीन वातानुकूलित (एसी) लोकल सुरू करण्यात आल्या असून दररोज चौदा फेऱ्या होत आहेत. शुक्रवार ते शनिवार ही सेवा असून रविवारी एसी लोकल बंद असते. सेवा सुरू झाल्यापासून प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाढत्या उन्हाचा तडाखा आणि गर्दीपासून सुटका मिळवण्यासाठी ‌‘हार्बर‌’वरील चाकरमानी आता मोठ्या प्रमाणात एसी लोकलकडे वळत गारेगार प्रवासाला पसंती देत असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT