Mumbai Water Supply Pudhari
मुंबई

Mumbai Water Supply: अप्पर वैतरणा तलाव आटला; मुंबईला होणारा पाणीपुरवठा बंद

2025 मध्ये या तलावात 1 जूनपर्यंत 7 टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा होता.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा नाशिक जिल्ह्यातील राज्य सरकारच्या मालकीचा अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे आटल्यामुळे या तलावातून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. 2025 मध्ये या तलावात 1 जूनपर्यंत 7 टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा होता.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असून सध्या 15.57 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात सात तलावांपैकी नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे आटला असून या तलावातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला.

त्यामुळे आता मुंबई शहराची तहान सहा तलावांना भागवावी लागणार आहे. तुळशी व विहार तलाव लहान असल्यामुळे या तलावांतून दररोज जेमतेम 15 ते 18 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे सध्या राज्य सरकारच्या मालकीचा असलेल्या भातसा व मुंबई महानगरपालिकेच्या मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा या तलावांवर मुंबईकरांना अवलंबून राहावे लागणार आहे.

दरम्यान तानसा तलावातील पाणीसाठाही 10 टक्केवर आला असून या तलावातील पाणीपुरवठा कधीही बंद होऊ शकतो. त्यामुळे भातसा तलावावर मुंबईकरांना अवलंबून राहावे लागणार आहे. भातसा तलावात अद्यापही 1 लाख 7 हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असून यातून दररोज सुमारे 1 हजार 700 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे.

तर उर्वरित तानसा मोडकसागर व मध्य वैतरणा, तुळशी विहार या तलावांतून पाणीपुरवठा होत आहे. सध्या सहा तलावांमध्ये 2 लाख 25 हजार 294 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असून सध्याचे बाष्पीभवन लक्षात घेता, हा पाणीसाठा जेमतेम 40 ते 45 दिवस पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीटंचाई टाळण्यासाठी आता मुंबईकरांना पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT