मुंबई/ठाणे/पालघर: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नॅशनल पार्कच्या विहार तलावानंतर तुळशी तलावही बुधवारी पहाटे ओसंडून वाहू लागला. यामुळे मुंबईत सुरू असलेल्या पाणी टंचाईचे संकट लवकरच दूर होईल आणि आठवडाभरात सध्याची पाणीकपात रद्द होईल असे संकेत आहेत. मुसळधार पावसाने ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील पाच प्रमुख धरणे ओव्हरफ्लो झाली असून त्यात कवडास धरणाचाही समावेश आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी सर्वात लहान असला तरी तुळशी तलावातून मुंबई शहराला दररोज १८ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. हा तलाव हा गेल्या वर्षी १६ ऑगस्टला भरून वाहू लागला होता.२०२४ मध्ये तो ४ ऑगस्टला वाहू लागला होता. यंदा संपूर्ण जून कोरडा गेल्यानंतरही जुलैच्या पहिल्याच आठवड्यात तो भरला.
५ प्रमुख धरणे ओव्हरफ्लो
पालघर जिल्ह्यातील कवडास धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने त्याचे सर्व १७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून सूर्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आले आहे. केळवे रोड परिसरातील झांझरोळी धरण (माहीम-केळवे लघुपाटबंधारे योजना) देखील शंभर टक्के भरले आहे.
वांद्री धरण तुडुंब भरून सांडव्यातून वेगाने पाणी सोडले जात आहे. पेल्हार धरणानेही कमाल पाणीपातळी गाठली असून धरणातील पाणीसाठा पूर्ण क्षमतेवर पोहोचला आहे.ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण अवघ्या काही दिवसांच्या दमदार पावसात पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. या सर्व धरणांच्या क्षेत्रात सतर्कतेचे आदेश दिले गेले आहेत.
पाणीकपात रद्दची आशा
मुंबईत सध्या सरासरी २०% पाणीकपात असून व्यावसायिक पाणीपुरवठ्यावर निर्बंध आहेत. जलतरण तलावांचाही पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. मात्र तलावांतील पाणीसाठ्यात होत असलेल्या वाढीमुळे लवकरच पाणी कपातीचा निर्णय मागे घेतला जाऊ शकतो. पाणीसाठा किमान ६० ते ७० टक्केपर्यंत पोहोचल्यास ही कपात रद्द होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.