मुंबई : तलाव क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे गेल्या २४ तासांत मुंबईकरांना ४३ दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. पाणीसाठ्यात १ लाख ७३ हजार ७४९ दशलक्ष लिटर इतकी वाढ झाल्यामुळे पाणीसाठा ४ लाख १८ हजार ६४९ दशलक्ष लिटरवर पोहचला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील प्रमुख तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत १७२ मिमी ते ३४५ मिमी इतका विक्रमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. तानसा तलावातील शून्यावर पोहचलेला पाणीसाठा आता ६२ दशलक्ष लिटर इतका झाला आहे. तर नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलावातील पाणीसाठाही शून्यावरून २७ हजार ८१९ दशलक्ष लिटर इतका झाला आहे. शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाणीसाठाही २४.५० टक्केवर पोहचला आहे. अन्य तलावांतील पाणी साठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे.
तलावांतील पाणीसाठा ६ टक्केपर्यंत खाली गेला होता, तो आता २९ टक्केपर्यंत वाढला आहे. म्हणजे सरासरी २३ टक्के पाण्यामध्ये वाढ झाली आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलाव वगळता, मुख्य तलावांमध्ये जवळपास ७०० ते ९०० मिमी पाऊस झाला आहे. तर मुंबई शहरातील विहार व तुळशी तलावामध्ये सर्वाधिक १४०० ते २००० मिमी पाऊस झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे नॅशनल पार्कमध्ये असलेला विहार व तुळशी तलाव पाण्याने भरला आहे. हे दोन्ही तलाव कोणत्याही क्षणी ओसंडून वाहू लागतील. विहारमध्ये ९९ टक्के पाणीसाठा झाला असून तर तुळशी तलावात जवळपास ९६ टक्के पाणीसाठा झाला आहे.
तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर) व ७ जुलैचा पाऊस
अप्पर वैतरणा : २७,८१९ - ४० मिमी
मोडकसागर : ६७,३१९ - १०१ मिमी
तानसा : ६२,१६१ - १४२ मिमी
मध्य वैतरणा : ५०,५४४ - ८७ मिमी
भातसा : १,७५,६७६ - १६५ मिमी
विहार २७,४१६ - २१३ मिमी
तुळशी ७,७१५ - २८७ मिमी