Mumbai Lake Water Stock Pudhari
मुंबई

Mumbai Water Stock: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! दोन दिवसांच्या पावसाने तलावसाठ्यात मोठी वाढ

गेल्या दोन दिवसात ४७ हजार ४७९ दशलक्ष लिटर पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: तलावाच्या पाणलोट क्षेत्रात दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात होणारी घट थांबली असून आता पुन्हा पाणीसाठा वाढू लागला आहे. गेल्या दोन दिवसात ४७ हजार ४७९ दशलक्ष लिटर पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीसाठा ५४ टक्केच्या वर पोहचला आहे.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्राकडे पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली होती. त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी पुन्हा घसरू लागली होती. तब्बल १० ते १२ दिवस पाऊस नसल्यामुळे मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाची चिंताही वाढली होती.

परंतु गेल्या दोन दिवसापासून पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडू लागल्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊ लागली आहे. शनिवार १८ जुलैला सात तलावांमध्ये ७ लाख ३४ हजार ८९१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. सोमवार २० जुलै सकाळी सहा वाजेपर्यंत पाणीसाठा ७ लाख ८२ हजार ३७० दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे.

निम्म्या मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या भातसा तलावातील पाणीसाठाही ४८ टक्केवर पोहचला आहे. या तलावामध्ये ३ लाख ४५ हजार ६२६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा झाला आहे. अन्य तलावातील पाणीसाठ्यातही वाढ होत असून तानसातील पाणीसाठा ८६ टक्के तर मोडक सागरमधील पाणीसाठा ८२ टक्केवर पोहचला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT