मुंबई : मुंबईला शहराला पाणीपुरवठा करणार्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून त्या वारंवार फुटत आहेत. यातून लाखो लीटर पाणी वाया जात असते. एकूण पुरवठ्यातील 15 टक्के पाणी फुकट जात असल्याची माहिती जल विभागातील अधिकार्यांनी दिली.
मुंबईला पाणीपुरवठा करणार्या सात धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता 1 लाख 44 हजार 736.3 कोटी लिटर आहे. तरी देखील उन्हाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. याचे प्रमुख कारण म्हणजे गळतीमुळे वाया जाणारे पाणी. पुरवठा होणारा 100 टक्के पाणीसाठा मुंबईकरांच्या वापरात येत नसून किमान 15 टक्के पाणी वाया जात आहे.
गळती शोधण्यासाठी जल विभागांमध्ये पथके नेमण्यात आली आहेत. अनेक जलवाहिन्या जमिनीच्या खूप खोलवर असून त्या जीर्ण झाल्या आहेत. या जलवाहिन्यांमध्ये गळती लागली की अनेकदा त्याचा शोध लागत नाही. त्यामुळे पाण्याचा मोठया प्रमाणात अपव्यय होत आहे.