मुंबई: मुंबईकरांना आता पाणीटंचाईची सवय झाली असून गेल्या काही महिन्यांत पाणीटंचाईच्या तक्रारीची संख्या सुमारे ३० ते ३५ टक्केने कमी झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठ्यात तब्बल ४०० दशलक्ष लिटरपेक्षा जास्त घट झालेली असतानाही तक्रारी कमी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई शहराला दररोज ४ हजार १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असतानाही मुंबई करणार पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे पालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये दररोज किमान २०० ते २५० तक्रारी येत होत्या. यात कमी दाबाने पाणीपुरवठा, पाणी न येणे, गढूळ व दूषित पाण्याच्या तक्रारींचा समावेश आहे.
मात्र आता पाणी पुरवठ्यामध्ये ४०० दशलक्ष लिटरपेक्षा घट झालेली असताना पाणीटंचाईच्या तक्रारी कमी झाले आहेत.
सध्या दररोज सरासरी १७० ते १६० तक्रारी येतात. यात पाणीटंचाईपेक्षा दूषित व गढूळ पाण्याच्या तक्रारींची संख्या जास्त आहे. पाणीटंचाई बाबत अनेकदा तक्रार करूनही पालिकेकडून तातडीने दखल घेतली जात नाही. त्यामुळे अनेकांनी आता तक्रारी करणे बंद केले असून पाणी टंचाईची सवय लावून घेतली आहे.
मुंबईच्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात झाल्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी टंचाई भासत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे अनेक भागात शेवटच्या टोकापर्यंत पाणीच पोहचत नाही.
याकडे महापालिका सभागृहात नगरसेवकांनीही अनेकदा लक्ष वेधले, मात्र पाणीटंचाईची समस्या सुटलेली नाही. नगरसेवकांच्या तक्रारीनंतर एका भागात बसणारी पाणीटंचाई काही दिवसांसाठी दूर होते. मात्र याचवेळी दुसऱ्या भागात पाणीटंचाईची झळ पोहोचते, अशी तक्रार नगरसेवकांची आहे.
पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवर ठिकठिकाणी पाणी सोडणे व बंद करण्यासाठी चावी बसवण्यात आली आहे. या चावीचे आटे किती फिरवावेत, याचे चावीवाल्यांना ट्रेनिंग दिलेले असते. त्यानुसार चावी फिरवली जाते.
ज्या भागात जलवाहिनी जाते त्या भागातील चावी जास्त प्रमाणात फिरवली तर त्या भागातील पाणीटंचाई दूर होते. मात्र हीच चावी चार आटे कमी फिरवली तर पाणी टंचाई भासते. त्यामुळे सर्व काही चावीची कमाल आहे.