Mumbai water supply pudhari photo
मुंबई

Mumbai water supply : तलाव भरले, तरी मुंबईत पाणीकपात सुरूच राहणार!

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा १ लाख दशलक्ष लीटरपेक्षा खाली गेल्यामुळे शहरात २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन चार दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे पाणी साठ्याने १० लाख दशलक्ष लिटरचा टप्पा ओलांडला आहे. परंतु सर्व तलाव पूर्णपणे भरत नाहीत, तोपर्यंत पाणी कपात सुरू राहणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अभियंत्याने स्पष्ट केले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा १ लाख दशलक्ष लीटरपेक्षा खाली गेल्यामुळे शहरात २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्याशिवाय इमारतीच्या बांधकामासह जलतरण तलावांना होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. परंतु आता तलावातील पाणीसाठ्याने दहा लाख दशलक्ष लिटरचा टप्पा ओलांडला आहे. म्हणजेच तलावांमध्ये ७० टक्के पाणीसाठा झाला आहे.

त्यामुळे शहरात सुरू असलेली पाणी कपात येत्या जुलै अखेरपर्यंत रद्द होण्याची शक्यता होती. परंतू महापालिकेने सध्यातरी पाणी कपात रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे स्थायी समितीतही गुरुवारी प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले. उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई टाळण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत तलाव भरलेली असणे आवश्यक आहे. त्यामुळे आत्ताच पाणी कपात रद्द केल्यास उद्या पाऊस झाला नाही तर उन्हाळ्यात मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.

यासाठी सर्व तलाव जोपर्यंत भरत नाहीत, तोपर्यंत पाणी कपात रद्द करण्यात येणार नसल्याचे पालिकेच्या जलअभियंता विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. याला पालिकेची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना अजून काही दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

भातसाचा पाणीसाठा ६५ टक्केवर

निम्म्या मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या भातसा तलावातील पाणीसाठा ६५ टक्के वर पोहोचला. या तलावामध्ये ७ लाख १७ हजार ३७ दशलक्ष लिटर पाणी साठवण क्षमता आहे. या तलावामध्ये ४ लाख ६६ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे.

मोडक सागरही वाहू लागला

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार, तुळशी, तलावानंतर बुधवारी तानसा तलाव तर गुरुवारी मध्यरात्री २ वाजता मोडक सागर तलावही वाहू लागला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तलावा पैकी मोडक सागर हा तलाव असून या तलावातून शहराला दररोज ४५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. या तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता १२,८९२.५ कोटी लिटर (१,२८,९२५ दशलक्ष लिटर) आहे. २०२५ मध्‍ये ९ जुलै, २०२४ मध्ये २५ जुलै, २०२३ मध्ये २७ जुलै रोजी 'मोडक सागर' तलाव ओसंडून वाहू लागला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT