Mumbai Water Cut Pudhari
मुंबई

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! आणखी १० टक्के पाणीकपातीचा विचार

सातही तलावांत ८४ टक्के पाणीसाठा; जुलै २०२७ पर्यंत पाणीपुरवठा टिकवण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजनांचा विचार.

पुढारी वृत्तसेवा

राजेश सावंत

मुंबई: यंदा समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट कायम आहे. सध्या तलावांमध्ये असलेले पाणी जुलै अखेरपर्यंत पुरवण्यासह भीषण पाणीटंचाईतून मार्ग काढण्यासाठी पाणीकपातीमध्ये अजून १० टक्केपर्यंत वाढ करण्याचा विचार महापालिकेचा आहे.

मुंबई शहरात सध्या १० टक्के पाणीकपात सुरू असून ही कपात कायम ठेवण्यात येणार आहे. पण सध्याचा तलावातील पाणीसाठा लक्षात घेता दहा टक्के पाणीकपात सुरू ठेवूनही जुलै २०२७ अखेरपर्यंत दीड कोटी मुंबईकरांना पाणी पुरवणे अशक्य आहे.

सध्या सातही तलावांमध्ये ८४ टक्के म्हणजे १२ लाख २६ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या दररोज सरासरी साडेचार ते पाच हजार दशलक्ष लिटर पाणी तलावातून उचलले जाते. त्यामुळे जेमतेम आठ महिने जून अखेरपर्यंत पाण्याचा पुरवठा करणे पालिकेला शक्य आहे.

सध्याच्या १० टक्के पाणी कपातीमुळे दररोज ४०० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होत आहे. म्हणजेच महिन्याला १२ हजार दशलक्ष लिटर पाण्याची बचत होते. सध्याचा सातही तलावांतील पाणीसाठा जुलै २०२७ अखेरपर्यंत पुरवण्यासाठी अजून दहा टक्के पाणीकपात केल्यास पाण्यामध्ये सरासरी दररोज ४०० दशलक्ष लिटर बचत होणार आहे.

मार्चपासून पाणी कपातीमध्ये वाढ केल्यास चार महिन्यांत सरासरी ५० हजार दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार आहे. पाणीटंचाई टाळण्यासाठी पाणीबचत हाच एकमेव पर्याय मुंबईकरांपुढे शिल्लक राहिला असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. मुंबईमध्ये प्रामुख्याने उंचावर असलेले भाग आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्यामुळे तीव्र टंचाई जाणवत आहे.

मुंबईकरांना पाणी पुरविणाऱ्या मुख्य तलावांवरील ताण कमी करण्यासाठी आणि अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईतील स्थानिक विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याचे पुनरुज्जीवन व नियोजन सुरू केले आहे. मुंबईत दररोज होणारी पाण्याची गळती व अनधिकृत जोडण्यांमधून होत असलेली पाणी चोरी शोधण्यासाठी पालिकेचे पथक विशेष मोहीम राबवत आहे.

२०२५ च्या तुलनेत ११ टक्के कमी पाणीसाठा

  • सातही तलावामध्ये २०२५ च्या तुलनेत यंदा अकरा टक्के कमी पाणीसाठा आहे. २०२५ मध्ये १ नोव्हेंबरपर्यंत ९५ टक्के म्हणजे १३ लाख ८० हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता.

  • यावेळी हा पाणीसाठा १२ लाख २६ हजार दशलक्ष लिटर इतका आहे. म्हणजेच सरासरी १ लाख ५४ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT