BMC Pudhari
मुंबई

Mumbai Water Cut: पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय लांबणीवर! जल अभियंता विभागाला सबुरीचा सल्ला

पाणीकपात रद्दचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: तलावांतील पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे पाणीकपात रद्द होण्याची शक्यता होती. पण गेल्या दोन दिवसापासून तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्यामुळे महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी जल अभियंता विभागाला सबुरीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पाणीकपात रद्दचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ५० टक्के पाणीसाठा झाल्यामुळे पाणीकपात रद्द होईल असे वाटत होते. परंतु कपात रद्द करण्यासाठी किमान ७० ते ८० टक्के पाणीसाठ्याची गरज आहे. त्यामुळे कपात रद्द करण्याचा निर्णय सध्या तरी स्थगित ठेवल्याचे जल अभियंता विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईत सध्या सरासरी २० टक्के पाणीकपात असून काही निर्बंधही लावण्यात आले असून जलतरण तलाव व इमारतीच्या बांधकामाला देण्यात येणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

त्यामुळे दररोज सरासरी १ हजार दशलक्ष लिटर पाण्याची बचत होत आहे. कपात रद्द करून सर्व निर्बंध उठवल्यास पाण्याची मागणी पुन्हा वाढेल. त्यामुळे जोपर्यंत पाणीसाठा अजून वाढत नाही व तलाव क्षेत्रात पुन्हा पाऊस सुरू होत नाही तोपर्यंत पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेणे संयुक्तिक ठरणार नाही.

एकदा पाणीकपात रद्द केली आणि पाऊस लांबला, तर पुन्हा कपात केल्यास मुंबईत मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याची कपात काही दिवस चालू ठेवून पाण्यामध्ये बचत करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

७ लाख दशलक्ष लिटर पाण्याची गरज

तलाव भरण्यासाठी व मुंबईकरांवरील पाणीटंचाई दूर करण्यासाठी अजून ७ लाख दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. सात तलावांमध्ये सुमारे १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी पाणी साठवण्याची क्षमता आहे.

विशेष म्हणजे मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे संकट दूर होण्यासाठी भातसा धरण पूर्णपणे भरणे आवश्यक आहे. एकूण सात तलावांपैकी एकट्या भातसा धरणामध्ये निम्मा पाणीसाठा म्हणजे ७ लाख दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणी साठवण्याची क्षमता असल्याचे पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT