BMC Pudhari
मुंबई

Mumbai Water Cut: मुंबईत औद्योगिक व व्यावसायिक पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात; बीएमसीचा मोठा निर्णय

10% पाणीकपातीनंतर बीएमसीची आणखी कठोर भूमिका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. आता नवीन बांधकामे, जलतरण तलावांच्‍या पाणीपुरवठ्यावरसुद्धा मर्यादा आणून औद्योगिक व व्यावसायिक पाणी वापरात २० टक्के कपात करण्याचा निर्णय १६ जून २०२६ रोजी घेतला आहे.

सर्व बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडित करण्‍यात येणार असून नवीन बांधकामांसाठी दिल्‍या जाणाऱ्या जलजोडणी स्‍थगित करण्यात आल्‍या आहेत. तसेच, सर्व जलतरण तलावांच्‍या जलजोडण्या तात्पुरत्या खंडित करण्‍यात येणार आहेत.

या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याचा गैरवापर अथवा अपव्यय होत असल्याचे आढळल्‍यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

महाराष्ट्र शासनाच्‍या जलसंपदा विभागाच्‍या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेने पिण्‍याच्‍या पाण्‍याचे नियोजन करत काटकसरीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्‍यानुसार, महानगरपालिकेच्‍या जल अभियंता विभागाने पाणी कपातीच्‍या कालावधीत करावयाच्‍या उपाययोजनांबाबत सविस्‍तर परिपत्रक निर्गमित केले आहे.

मुंबई शहर व उपनगरांसाठी सध्या प्रतिदिन सुमारे ४ हजार ६६४ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्‍यकता आहे. उपलब्ध पर्यायामधून मुंबई महानगराला प्रतिदिन सरासरी ४ हजार १०० दशलक्ष लिटर इतके पाणी पुरविले जाते.

खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार मुंबईत दिनांक १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. सद्यस्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्‌यात घट झाली असून आज दिनांक १६ जून २०२६ रोजी उपलब्ध पाणीसाठा हा १०.३५ टक्के इतकाच शिल्लक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT