Mumbai Water Cut (Pudhari File Photo)
मुंबई

Mumbai Water Cut: शहर, उपनगरांना पाणी कपातीची झळ; टँकरची मागणी वाढली

जल बोगद्याच्या कामांमुळे 5% कपात जाहीर; प्रत्यक्षात 25% पर्यंत पाणी घट

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: जल बोगद्याच्या क्लोरीनीकरण व डी-क्लोरीनीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे 5 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी सोमवारी पाणीकपातीची मोठी झळ पोहचली. शहरासह पूर्व उपनगरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासल्यामुळे काही भागात टँकर मागवावे लागले.

क्लोरीनीकरण व डी-क्लोरीनीकरणाची कामे आठवडाभर म्हणजेच 20 ते 27 एप्रिल या कालावधीत चालणार आहेत. या काळात शहर व पूर्व उपनगरामध्ये 5 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात या भागातील नागरिकांना 10 ते 15 टक्के तर काही भागात 20 ते 25 टक्केपर्यंत पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.

सोमवारी पहिल्याच दिवशी 5 टक्के पाणीकपात असतानाही मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई भासली. पालिकेच्या कुर्ला एल विभागातील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला तर काही भागात जेमतेम पाच ते दहा मिनिटे पाणी मिळाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. गोवंडी एम पूर्व विभागातील बैंगनवाडी, शिवाजीनगर, मानखुर्द अधिभागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासली.

घाटकोपर, भांडुप व मुलुंडमध्येही पाणीटंचाईची झळ पोहचली. भांडुपच्या डोंगराळ भागात कमी दाबाने पाणी पुरवठा झाल्यामुळे काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

चेंबूर, टिळक नगर आदी भागातही नेहमीपेक्षा कमी पाणी आले. दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट, कुलाबा, फोर्ट, क्रॉफर्ड मार्केट, पायधुनी, चंदनवाडी, चिरा बाजार, गिरगाव, भायखळा, माझगाव, नागपाडा, परळ, लालबाग, काळाचौकी, शिवडी, वडाळा, अँटॉप हिल, माटुंगा आदी भागातही कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्यामुळे पाण्याची मोठी टंचाई भासली.

टंचाई दूर करण्याचे प्रयत्न

पाणीकपात असल्यामुळे नेहमीपेक्षा कमी पाणी शहरात आणले गेले. त्यामुळे काही भागात निश्चित पाणी टंचाई भासली असणार. त्यामुळे पाणीटंचाई दूर करण्यासाठी महापालिकेच्या जल अभियंता विभागाने योग्य नियोजन केले आहे. त्याची अंमलबजावणी सुरू असून पुढील काही दिवस काही प्रमाणात पाणी कमी मिळाले तरी, प्रत्येकाला मिळेल याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT