Mumbai Water Crisis pudhari photo
मुंबई

Mumbai Water Crisis : मुंबईत 2029 पर्यंत दहा टक्के पाणीकपात

सलग तीन वर्षे करावी लागणार काटकसर : ४,१०० ऐवजी दररोज ३,६९० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राजेश सावंत

गारगाई पाणीपुरवठा प्रकल्प व समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत म्हणजेच २०२९ पर्यंत मुंबईत १० टक्के पाणी कपात कायम राहणार आहे. परिणामी मुंबईकरांना ४,१०० दशलक्ष लिटर ऐवजी दररोज ३,६९० दशलक्ष लिटर इतकाच पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे येणारी तीन वर्ष मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत हा पाणीसाठा जैसे थे राहिला तरी, मुंबईकरांना कोणतीही पाणी कपात न करता आठ महिनेच पाणीपुरवठा करणे शक्य आहे.

म्हणजेच मे महिन्यामध्येच सर्व तलाव सुकून जातील. त्यामुळे किमान जून अखेरपर्यंत पाण्याची बचत करायची असेल तर, किमान दहा टक्के पाणी कपात कायमस्वरूपी सुरू ठेवावी लागेल. यातून महिना १२ हजार दशलक्ष लिटर पाण्याची बचत होईल. तर ८ महिन्यात जवळपास १ लाख दशलक्ष लिटर पाण्याची बचत होऊ शकते. त्यामुळे मे महिन्यातील पाणीटंचाई महिनाभर पुढे ढकलता येऊ शकते.

खारे पाणी गोड होईपर्यंत पाणीकपात

पाण्याची बचत करताना पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेने १० टक्के पाणी कपात २०२७ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण तलावातील पाणी साठवण्याची क्षमता लक्षात घेता, ऑक्टोबर ते जुलैपर्यंत १० महिने पाणी पुरवणे अशक्य आहे. त्यामुळे गारगाई पाणीपुरवठा प्रकल्पासह समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत म्हणजेच २०२९ पर्यंत पाणी कपात कायम ठेवावी लागणार आहे.

आगामी काळत २० टक्के पाणी कपातीची टांगती तलवार

२ लाख ५६ हजार दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा लक्षात घेता दहा टक्के पाणी कपात कायमस्वरूपी लागू करूनही दहा महिने पाणी पुरवणे शक्य नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात २० टक्के पाणी कपात लागू करणे भाग पडेल, असे मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अभियंत्यांचे म्हणणे आहे.

बाष्पीभवनाचीही समस्या गंभीर

  • शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातून दररोज ४,६३७ दशलक्ष लिटर पाण्याची उचल होते. त्याशिवाय भिवंडी व ठाणे शहरांना पुरवठा होणारे काही पाणी व बाष्पीभवनामुळे दररोज ५,६७८ दशलक्ष लिटर पाण्याची घट होत आहे.

  • महिना सरासरी १ लाख ७० हजार दशलक्ष लिटर पेक्षा जास्त पाण्याचा उपसा होतो. कपात न करता दहा महिने पाणी पुरवायचे झाल्यास १७ लाख १० हजार दशलक्ष लीटर पेक्षा जास्त पाण्याची गरज भासेल. तलावामध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT