Mumbai Water Crisis Pudhari
मुंबई

Mumbai Water Crisis: 10 टक्के पाणीकपात अटळ; महिनाअखेर घोषणा

29 एप्रिलपूर्वी पाणीकपातीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: तलावांतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत असल्यामुळे मुंबई 10 टक्के पाणीकपात अटळ आहे. पाणीकपात का करावी लागते, हे राज्य सरकारला पालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत पटवून देण्यात येणार आहे. त्यामुळे 29 एप्रिलपूर्वी पाणीकपातीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव आटू लागले असून आतापर्यंत 70 टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे अवघ्या 30 टक्के पाणीसाठ्यामध्ये येणारे दोन महिने मुंबईकरांची तहान भागवावी लागणार आहे.

तलावांमध्ये 4 लाख 43 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. परंतु उष्णतेमध्ये झालेल्या वाढीमुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे सध्याचा पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरवण्यासाठी 10 टक्के पाणीकपात करावीच लागेल, असे मत पालिकेच्या जल अभियंता विभागातील वरिष्ठ अभियंत्यांनी व्यक्त केले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील पाणीसाठा याचा आढावा घेऊन, 1 मेपासून दहा टक्के पाणीकपात लागू करण्यास परवानगी द्यावी, असे पत्र जल अभियंता विभागाने पालिका आयुक्तांमार्फत राज्य सरकारकडे पाठवले आहे.

महापालिकेच्या या पत्रावर अद्यापपर्यंत राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मुंबई महापालिका तलावांतील पाण्याचा पुन्हा आढावा घेऊन राज्य सरकारकडे सादरीकरण करणार आहे. यावेळी किमान 10 टक्के पाणी कपातीला परवानगी द्यावी, अशी विनवणीही करण्यात येणार आहे.

त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. तलावांतील सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता, राज्य सरकारलाही पाणीकपातीसाठी महापालिकेला परवानगी द्यावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाणीकपात अटळ आहे.

500 दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता भासणार

मुंबई महानगरपालिकेने दहा टक्के पाणी कपात लागू केल्यास शहराला दररोज 500 दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता भासेल. यामुळे काही भागात कमी दाबाने तर काही भागात 25 ते 30 टक्केच पाणी येईल, असे सांगण्यात येत आहे.

राखीव कोट्यातील पाण्याची मागणी करणार

मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू केली तरी राज्य सरकारकडून राखीव कोट्यातील पाणी वापरण्याची परवानगी मागण्यात येणार आहे. राखीव कोट्यात सुमारे 1 लाख 50 हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असतो. त्यामुळे यातील 50 पाणी वापरण्यात मिळाले तरी, मुंबईत फारशी पाणीटंचाई भासणार नाही.

मोरबे धरणात फक्त 43 टक्के पाणी

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात केवळ 43 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, 103 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे. आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन त्यांनी शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT