मुंबई: एकीकडे पावसाळा लांबल्यामुळे मुंबईकरांची जिवाची धाकधूक वाढली आहे तर दुसरीकडे धरणातील पाणीसाठा कमी होत चालल्यामुळे मुंबईकरांवर दहा टक्के पाणी कपात लादण्यात आली आहे. पाहिजे तितका पाऊस पडला नाही तर मुंबईकरांची पाणी कपात पुढील काळात वाढवण्यात येणार आहे.
महापालिकेच्या नळांद्वारे येणारे पाणी पुरत नसल्यामुळे अनेक इमारती, सोसायटी, चाळींमध्ये रहिवाशांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. ज्या विहिरींतून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो त्या विहिरींनाही लांबलेल्या पावसाचा व सिमेंट काँक्रीटचा मोठा फटका बसल्यामुळे पाच-सहा तासाने एक टँकर भरत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यात मेट्रोच्या जमिनीखालील खोलवर कामाचा दुष्परिणाम विहिरींवर झाला आहे.
उंच इमारतींचा पुनर्विकास, रस्त्यांच्या काँक्रीटीकरणामुळे मोठ्या प्रमाणात जलस्तोत्र बाधित झाले असून याचा फटका टँकर लाॅबीसह मुंबईकरांनाही बसत चालला आहे.. विहिरीतले पाणी कमी झाल्यामुळे पाच-सहा तासानंतर एक टँकर भरला जात असून विहिरींवर सिमेंटकाँक्रीटचा दुष्परिणाम जाणवू लागला आहे.
सिमेंट काँक्रीटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्यामुळे व त्यामुळे जमिनीखाली पावसाचे पाणीच मुरत नसल्यामुळे विहिरीही कोरड्या ठाक पडू लागल्या आहेत. याशिवाय उंच टोलेजंग इमारती उभारण्यासाठी फाउंडेशनपासून ते अगदी इमारतीच्या टोकापर्यंत सिमेंट काँक्रीटचा वापर होत असल्यामुळे जमिनीखाली पावसाचे पाणी मुरण्याची प्रक्रिया फारच मंदावली आहे.
सिमेंटच्या माऱ्यामुळे जमिनीखालचे झरे बुजत चालले आहेत. इमारती बाहेरील मोकळे परिसर तसेच मुंबईतील रस्तेही सिमेंट काँक्रीटचे करण्यात येत असल्यामुळे जमिनीखालील झरे बाधित होऊ लागले आहेत.
जमिनीखालच्या दगड, मातीत पावसाचे पाणी साचून राहत असते. याच पाण्याचा पुरवठा पुढच्या पावसाळ्यापर्यंत आपसुक विहिरींना होत असतो. पण पुनर्विकासवेळी इमारतीखालची बाहेर काढलेली दगड माती इतर अन्य ठिकाणी टाकून दिली जाते आणि इमारतीच्या बाजूला लेवल करण्यासाठी पुन्हा सिमेंट काँक्रीटचा वापर केला जातो. त्याचा फटका मुंबईतल्या विहिरींना बसला आहे.
यंदा पाऊस लांबल्याने व सिमेंट काँक्रीटीकरणामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे पाच-सहा तासानंतर एक टँकर भरत असल्याने टँकरचा व्यवसायही डबघाईला आल्याचे एका टँकर मालकाने सांगितले.
टँकरच्या पाण्यावर अवलंबून इमारतींचा रहिवाशांनाही मोठा फटका बसत आहे.भूजलाची पातळी वाढवण्याकडे जर दुर्लक्ष केले तर नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्याचे मत ७५ वर्षांचे जलतज्ञ उल्हास परांजपे यांनी व्यक्त केले आहे.
जमिनीत पाणी मुरवायची गरज
जलतज्ज्ञ उल्हास परांजपे हे गेल्या २६ वर्षांपासून ग्रामीण भागासह मुंबईत जल स्तोत्र वाढवण्याचे कार्यक्रम घेऊन नागरिकांना जलसाठा वाढवण्यासाठी मार्गदर्शन करत आले आहेत. जलवर्धिनी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत हजारो कार्यक्रमांतर्गत असंख्य नागिकांना जल स्तोत्र वाढवण्याचे तंत्र शिकवले आहे.
हजार मीटर जागेवर दरवर्षी २० लाख लिटर पावसाचे पाणी पडते, ते साठवण्याची गरज असल्याचे त्यांचे मत आहे.मुंबईत दरवर्षी २ हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो मग अधिकचे पाणी जमिनीत मुरलं तर काय वाईट आहे. अशा रितीने पाण्याची साठवणूक केली तर ती आयुष्यभर पुरणारी असल्याचे उल्हास परांज यांनी सांगितले.