मुंबई: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यात मोठी घट होत आहे. त्यात पाऊस लांबल्यामुळे मुंबईकर भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर आहेत. तानसा तलावातील पाणीसाठा ५.५३ टक्केवर आला असून शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावातही अवघा १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
पाऊस लांबल्यामुळे मुंबई महानगरपालिकेची चिंता वाढली आहे. तलावांमध्ये असलेला जेमतेम १० टक्के पाणीसाठा पुरवायचा कसा, असा प्रश्नही पडला आहे.
सोमवारी (१५ जून) तलावातील पाण्याचा आढावा घेतला असता ६ तलावांच्या पाणलोट क्षेत्रात अवघा १०.७२ टक्के म्हणजे १ लाख ५५ हजार दशलक्ष लिटर्स पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा महिनाभर पुरेल इतका असला तरी अद्यापपर्यंत पाऊस नसल्यामुळे येणाऱ्या काळात पाणीटंचाई भासू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
मागील दोन वर्षांची तुलना केल्यास तानसा तलावातील पाण्याची पातळी जास्त घसरली आहे. १५ जून २०२४ मध्ये तानसा तलावात २२ टक्के, तर २०२५ मध्ये १० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यावेळी हा पाणीसाठा सुमारे पाच टक्केपर्यंत खाली आला आहे.
शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या राज्य सरकारच्या भातसा तलावातील पाण्याचाही मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्यामुळे या तलावात आता जेमतेम ७२ हजार दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.
या तलावात सरासरी ७ लाख १७ हजार दशलक्ष लिटर इतके पाणी साठवण्याची क्षमता आहे. म्हणजेच ऑक्टोबर २०२५ पासून आतापर्यंत या तलावातून सरासरी साडेसहा लाख दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. या तलावातून मुंबईला दररोज २ हजार दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो.
पावसाची प्रतीक्षा
मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी पालिकेच्या जल अभियंता विभागाला पावसाची प्रतीक्षा आहे. येत्या आठवडाभरात तलावाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यास पाणीटंचाईचे संकट दूर होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र पाऊस अजून लांबल्यास मुंबईकरांना टँकरवर अवलंबून राहावे लागणार आहे.