मुंबई : मुंबईचा कचरा दररोज वाहून नेणाऱ्या वाहनांच्या ताफ्यात आता तीस नवीन मिनी कॉम्पॅक्टर वाहने दाखल झाली आहेत. त्यामुळे वाहनांअभावी पडून राहिलेला कचऱ्याची समस्या आता दूर होणार आहे. ही वाहने एका सत्रात दोन फेऱ्या करणार आहेत.
मुंबईत कचऱ्याचे वहन करणारे कॉम्पॅक्टर वाहने जुनी असून ती नादुरूस्त आहेत. यामुळे काही वेळा रस्त्यावर कचरा पडत आहे. जुन्या मिनी कॉम्पॅक्टरच्या तुलनेत नवीन वाहनांना एका फेरीत दुप्पट कचरा वाहून नेण्याची क्षमता आहे.
याआधीच्या वाहनांमध्ये भेडसावणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून परिवहन अभियांत्रिकी विभागाने यात सुधारणा केल्या आहेत. यात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य आसनव्यवस्था, ओला व सुका कचरा यांसाठी स्वतंत्र कप्पे, तसेच दीर्घकाळ टिकणाऱ्या साधनसामुग्रीचा वापर यांमुळे मिनी कॉम्पॅक्टरचे आयुष्यमान वाढण्यास मदत होणार आहे.
कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये, कचऱ्यातून निघणाऱ्या द्रव्यामुळे (लिचेट) धातुपत्रा सतत खराब होत असल्याचे आढळून येत होते. नव्या वाहनांमध्ये 5 मिमी जाडीच्या ‘हार्डेाक्स’ स्टील मटेरियलचे फ्लोरिंग वापरले आहे. परिणामी वाहनाचे आयुष्यमान चांगले राहणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यातील सर्व वाहनांचे रंग येत्या काळात पांढरा आणि निळा अशा रंगसंगतीत बदलण्याचा प्रशासनाचा मानस आहे. ही प्रक्रिया टप्पेनिहाय पद्धतीने पार पाडण्यात येणार आहे. आगामी कालावधीत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यातील सर्व वाहने ही नव्या रंगसंगतीनुसार रंगवण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
मिनी कॉम्पॅक्टरची वैशिष्ट्ये
इंजिन क्षमता : 115 अश्वशक्ती
एकाच फेरीत 5 टन कचरा वाहून नेण्याची क्षमता
9 घनमीटर - कचरा सामावण्याची अधिक क्षमता
कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र 4 आसनी व्यवस्था