आदित्य ठाकरे file photo
मुंबई

Mumbai ward boundary issue : मुंबईत एका प्रभागातील इमारती चक्क दुसऱ्या प्रभागात घुसवल्या!

आदित्य ठाकरेंचा आरोप : राज व उद्धव ठाकरे यांचे निवडणूक आयोगाला पत्र

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे भक्कम वर्चस्व असलेल्या मतदारसंघांना हात न लावता केवळ विरोधकांच्या प्रभागांत हेराफेरी करण्यात आल्याचा घणाघाती आरोप शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. विरोधकांचे प्रभाग डळमळीत करण्यासाठी त्यांच्या प्रभागातील काही इमारती दुसऱ्या प्रभागात दाखविण्यात आल्या आहेत. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला पुरावे दिल्याचे ते म्हणाले.

हा घोळ केवळ मुंबईपुरता नसून ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आदी महापालिका क्षेत्रांतही तो आहे. तेथील गोंधळही आम्ही लवकरच समोर आणू, असा इशाराही आदित्य यांनी दिला.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप यादीवर राज्य निवडणूक आयोगाने हरकती व सूचना मागविल्या आहेत. मात्र, मुंबईच्या प्रारूप यादीत प्रचंड गोंधळ असल्याचा आरोप करीत विभागनिहाय मतदारयादीतील विभाजनातील गंभीर त्रुटी दूर करून पारदर्शकपणे निवडणूक घेण्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिलेे.

आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे याची भेट घेत हे पत्र सादर केले. त्यानंतर शिवालय येथे पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी प्रारूप यादीवर टीकास्त्र सोडले.

महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निश्चित झाल्यानंतर त्यासंदर्भात हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. त्यानंतर प्रारूप मतदार यादी 7 नोव्हेंबरला येणार होती, ती पुढे ढकलून 14 नोंव्हेबरला, त्यानंतर 20 नोव्हेंबरला येणार असे सांगितले गेले. पण जेव्हा ही यादी आली तेव्हा यादीत अनेक गोंधळ समोर आले, असे ते म्हणाले.

अशी ही हेराफेरी

  • विरोधकांच्या अनेक प्रभागांतील यादीमधील काही इमारती दुसऱ्या प्रभागात दाखवल्या आहेत.

  • काही ठरावीक जात-धर्म-भाषा पाहून लोकं, याद्यांची फेरफार करून त्यांना दुसऱ्या वॉर्डात टाकले आहे.

  • हे प्रकार सर्व प्रभागात झालेले नसले तरी सत्ताधाऱ्यांचे प्रभाग मात्र जसेच्या तसे राहिले आहेत. याचा अर्थ फक्त विरोधी पक्षांच्या प्रभागांना लक्ष्य करून याद्यांमध्ये फेरफार करण्यात आले.

  • भांडुप, शिवडी, वरळी, माहीम, दिंडोशी, जोगेश्वरी, कुलाबा, वांद्रे पूर्व अशा अनेक मतदारसंघांत असा गोंधळ झाला आहे.

  • एका पत्त्यावर 35 लोकांची नावे मतदारयादीत आहेत. असे 26 हजार 319 पत्ते असून या पत्त्यांवर 8 लाखांहून अधिक मतदार आहेत.

  • मुंबईच्या मतदारयादीत 8 लाखांहून अधिक दुबार मतदार असून या प्रारूप यादीवर हरकती-सूचना नोंदविण्यासाठीची 21 दिवसांची मुदत देण्यात यावी, अशी मागणीही आयोगाकडे केल्याचे आदित्य म्हणाले.

  • साकीनाका येथील प्रभाग क्र. 162-163 मध्ये तब्बल 6 हजार मतदार असलेल्या इमारती अन्य प्रभागात दाखविण्यात आल्या आहेत.

  • सहा लाखांहून अधिक मतदारांच्या यादीत घर क्रमांकच नाहीत. अनेक मतदारांना मतदार क्रमांकच नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT