मुंबईलाही व्हायरल फिव्हर; चिंता वाढली pudhari photo
मुंबई

Viral fever Mumbai : मुंबईलाही व्हायरल फिव्हर; चिंता वाढली

विचित्र वातावरणाचा फटका, सर्दी, खोकल्याचे 20 टक्के रुग्ण वाढले

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : जपानमध्ये तापाची साथ जाहीर केली असून भारतातही हिवतापाचे रुग्ण वाढल्याने साथीची चिंता असताना ताप, सर्दी, खोकला आणि थकव्याने मुंबईकरही त्रस्त आहेत. या 20 टक्के रुग्णांत वाढ झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

दिर्घकाळ पावसाळा संपल्यानंतर दिवसभर सुर्यनारायण मुंबईवर कोपत आहे. चार दिवसांपासून तापमानाचा पारा 35 अंशावर गेला आहे तर 55 टक्के आर्द्रता आहे. यामुळे ऑक्टोबर हिटचे चटके बसत आहेत. सकाळी दहा वाजताचे उनही सध्या असह्य होत आहे. दिवसभर घामाच्या धारा लागलेल्या मुंबईकरांना रात्री मात्र गारवा सहन करावा लागला आहे. त्यात हवेतील धुळीचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे सर्दी ,खोकल्याचे रूग्ण वाढले आहेत. व्हायरल फिव्हर अधिक काळ राहत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

उकाड्यामुळे थंड पदार्थांचे सेवन वाढल्याने घशाच्या खवखव वाढली आहे. याचबरोबर उष्णतेमुळे डिहायड्रेशनही होत असून चक्कर येणे, मळमळणे, डोकेदुखी यासंबंधीही तक्रारी वाढल्याचे दिसन येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

30 ते 40 रूग्ण हे फक्त ताप, सर्दी खोकल्याचे येत आहेत. ताप तीन दिवसांमध्ये कमी होत असला तरी सर्दी, खोकला पाच दिवस राहत असल्याने मुंबईकरांनी काळजी घ्यावी. लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्यावी असे जनरल फिजिशियन डॉ. शोभना जैन यांनी सांगितले. घरातून बाहेर पडताना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, छत्री वापर करावा, पाणी भरपूर प्रमाणात प्यावे असेही सांगितले.

अशी घ्या काळजी

  • भरपूर पाणी प्या, डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि हायड्रेटेड राहा.

  • पौष्टिक आणि हलका आहार घ्या.

  • आजारी असताना शक्यतो बाहेर जाणे टाळा.

  • लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढत आहे. फ्लू, ताप, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये 20 टक्के वाढ दिसत आहे. ऑक्टोबर हीटमुळे शरीरातील आर्द्रत वाढत असल्याने आजार अधिक काळ टिकून राहत असून तो पसरत आहे.
डॉ.मधुकर गायकवाड, जे जे रुग्णालय, मेडिसीन विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT